भाजप वापरणार ठाकरे पॅटर्न; शिंदेसेनेला ‘सायलेंट’ करण्याची तयारी
पालघर: लोकसभा निवडणुकीच्या वाटाघाटीत शिंदेंच्या शिवसेनेला(political) सर्वाधिक नुकसान सहन करावं लागलं आहे. युतीत शिवसेना लढत असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग, परभणी, अमरावती, धाराशिव या चार जागा शिंदेंना सोडाव्या लागल्या आहेत. सेना आतापर्यंत लढवत असलेल्या चारपैकी दोन जागा भाजपला, एक जागा राष्ट्रवादीला, तर एक जागा रासपला गेली आहे. आता शिंदेसेनेला आणखी एक जागा सोडावी लागण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये सेनेचा खासदार असताना ही जागा भाजपला सोडावी लागण्याची नामुष्की शिंदेसेनेवर ओढावू शकते.
पालघरची जागा शिवसेनेकडे(political) आहे. इथे राजेंद्र गावित खासदार आहेत. पालघरच्या जागेवरुन शिवसेनेकडे राहणार की भाजपकडे जाणार याबद्दल संभ्रम आहे. त्यात आता बहुजन विकास आघाडीला महायुती घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गावित यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. बविआला महायुतीत घेऊन त्यांच्या उमेदवाराला कमळ चिन्हावर लढवण्याची चाचपणी केली जात आहे.
मनोरमधील सायलेंट रिसॉर्टमध्ये झालेल्या बैठकीनंतर भाजप शिंदेसेनेला पालघरमध्ये ‘सायलेंट’ करणार याची चर्चा जोर धरु लागली आहे. सायलेंट रिसॉर्टमध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील कोअर कमिटी, पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड अशा चार विधानसभांचे केंद्रप्रमुख, बुथप्रमुख, सुपर वॉरियर उपस्थित होते. बविआ हा चौथा पर्याय उपलब्ध झाल्यास ‘लग्न आपल्या घरचं आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय. त्यामुळे सर्वांनी जोरकस प्रयत्न करुन महायुती जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणायचंय,’ अशा सूचना पालकमंत्री चव्हाणांनी दिल्या.
२०१४ मध्ये पालघरची जागा भाजपनं जिंकली. चिंतामण वनगा इथून विजयी झाले. २०१८ मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. भाजपनं राजेंद्र गावित यांना तिकीट दिलं आणि निवडून आणलं. २०१९ मध्ये झालेल्या वाटाघाटीत पालघरची जागा शिवसेनेला मिळाली. पण सेनेकडे सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे गावित यांनाच सेनेनं आपल्याकडे घेतलं. ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं. गावित यांना उमेदवारी देण्यात आली. ते जिंकूनही आले.
२०१९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वापरलेला डाव वापरुन शिंदेंच्या सेनेला चीतपट करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचं दिसतंय. भाजप बविआच्या उमेदवाराला पालघरमध्ये भाजपच्या चिन्हावर लढण्यास सांगण्याची शक्यता आहे. हा उमेदवार विजयी झाल्यास भाजपचं संख्याबळ वाढेल. तर शिंदेंना धोबीपछाड मिळेल. विद्यमान खासदार सेनेचा असताना ती जागा गमावण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर येईल.
हेही वाचा :
गोळीबारानंतर सलमान खानचा गॅलॅक्सी सोडण्याचा निर्णय? अरबाजने केला खुलासा
कृणाल पांड्या दुसऱ्यांदा झाला ‘बाबा’, मुलाला दिलं गोडंस नाव
सकाळच्या या ५ सवयींमुळे अनेक आजारांपासून राहाल दूर