दिवसाढवळ्या गोळीबार; आईस्क्रीम व्यावसायिक गंभीर जखमी
सासवड : पुरंदर तालुक्यात लाठ्याकाठ्यांनी मारामारी, सत्तूर, तलवारीने वार अशा घटना (Ice cream)यापूर्वी घडत होत्या. परंतु आता तालुक्यात बेकायदेशीर बंदुकी, पिस्तुल मोठ्या प्रमाणात वाढल्याने थेट पिस्तुलातून गोळ्या झाडल्या जात आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यात गुन्हेगारी किती वाढली आहे याचा अंदाज केलेला बरा. सासवडमध्ये तिघा अज्ञात व्यक्तींनी एका आयस्क्रीम पार्लरच्या व्यावसायिकावर अत्यंत जवळून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या भरदुपारी अत्यंत गजबजलेल्या परिसरात अशी घटना घडल्याने पुरंदर तालुका हादरून गेला आहे.
राहुल नामदेव टिळेकर, रा. दिवे, ता. पुरंदर असे याघटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गोळीबार केल्यानंतर तिघेही हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून त्यांच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी राहुल टिळेकर यांचे सासवड येथील एसटी बसस्थानक समोर सोपाननगर रोडलगत श्रीशा’ ज आयस्क्रीम पार्लर नावाने दुकान असून, गुरुवारी दुपारी ३. ३० च्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती दुकानात शिरल्या. त्यांनी विविध आयस्क्रीमची चौकशी केली. तसेच परिसरात कानोसा घेवून पुन्हा दुकानात शिरले. त्यापैकी एकाने रस्त्यालगत दुचाकी सुरूच करून ठेवली होती.
दुकानात शिरल्यावर खाण्यासाठी आयस्क्रीम घेतली. आयस्क्रीम (Ice cream)दिल्यानंतर राहुल टिळेकर हे बाहेरील बाकडावर बसून मोबाईल पाहत बसले. त्यानंतर दोघांनी आयस्क्रीम खाण्यास सुरुवात केली. तर तिसऱ्या व्यक्तीने खिशातून पिस्तुल काढला आणि बेसावध असलेल्या राहुल टिळेकर याच्या थेट कमरेला लावून अत्यंत जवळून गोळीबार केला.
दरम्यान गोळीबाराचा आवाज एवढा मोठा होता कि, परिसरातील नागरिकांना काय झाले हेच लक्षात आले नाही. त्यानंतर दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचवेळी दुकानासमोरील काही व्यक्तींनी ही घटना पाहताच आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर पिस्तुल रोखल्याने सर्वजण मागे फिरले आणि हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. दरम्यान हल्लेखोरांनी तोंडाला मास्क आणि डोक्याला कापड बांधले होते. तसेच दुचाकीची नंबरप्लेट काढली असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी जखमीस प्रथम चिंतामणी रुग्णालयात त्यानंतर पुणे हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ऋषीकेश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चोरघे, आतकरी, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे आदींनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तसेच ठसे तज्ञ पथक, श्वानपथच्या अधिकाऱ्यांनी येवून संपूर्ण परिसराची पाहणी केली. पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनीही घटनेची माहिती घेऊन सासवड पोलिसांसह पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या मदतीने विशेष पथके तयार करून तपासास सुरुवात केली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
हेही वाचा :
नीट-यूजी पेपर लीक प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि पुढील सुनावणी
‘नातं टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण…’, हार्दिकने केले घटस्फोटावर शिक्कामोर्तब
राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना मोहरा घरवापसी करणार, शरद पवारांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश?