उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारवरच वैतागले…; म्हणाले,”अरे गप्प बसा ना बाबा”

ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण(politics) रंगले आहे. नुकतेच राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. निवडणुकीनंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे राजकीय टीका टिप्पणी करण्यात आली. तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी आंदोलन देखील केले.

याच दरम्यान, महायुतीकडून खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले असून अनेक मंत्र्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. या खातेवाटपाबाबत प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकारांवर वैतागले आहेत.

अजित पवार यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय(politics) विषयांवर भाष्य केले. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, विधानसभेचे आमदार राजेश विटेकर आणि प्रताप पाटील चिखलीकर हे देखील उपस्थित होते. पत्रकारांनी महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारला. मात्र त्यांच्या या प्रश्नांमुळे अजित पवार हे वैतागले असल्याचे दिसून आले.

अजित पवार काल (दि.21) रात्री ठाण्यातील एका कार्यक्रमासाठी आले होते. ते गाडीतून उतरताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले. तसेच अनेक पत्रकारांनी देखील अजित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी पत्रकारांनी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झाल्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार संतापल्याचे पहायला मिळाले. या प्रश्नाला उत्तर देताना, “अरे गप्प बासा ना बाबा “, असे म्हटल्याचे ऐकू येत आहे. त्यामुळे अजित पवार हे खातेवाटपाच्या प्रश्नावर संतापले असल्याचे दिसून आले.

महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी यश मिळाले. मात्र मुख्यमंत्रिपद व इतर बोलणी सुरु असल्यामुळे सत्तास्थापनेला उशीर झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाराजीनाट्य सुरु होते. सत्तास्थापन झाल्यानंतर देखील मंत्रिमंडळ विस्तारावरुन देखील महायुतीमध्ये वादंग झाला.

नावे जाहीर झाल्यानंतर अनेक जेष्ठ नेते नाराज असल्याचे दिसून आले. यामध्ये शिंदे गटाचे तानाजी सावंत, अजित पवार गटाचे छगन भुजबळ तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचे दिसून आले. या माजी मंत्र्यांना पुन्हा संधी न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता खातेवाटप जाहीर झाले असून अनेकांच्या जबाबदारीमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

महायुतीमध्ये गृह खात्यावरुन जोरदार राजकारण रंगले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याचा कारभार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागील महायुतीच्या सरकारप्रमाणे यावेळी देखील राज्याची तिजोरी अर्थात अर्थखाते देण्यात आले आहे.

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे, उच्च आणि तंत्रशिक्षण हे चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते तर पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन ही खाती देण्यात आली आहेत.

हेही वाचा :

गौतमी पाटील चक्क पुण्याच्या पुस्तक महोत्सवामध्ये

मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी

राज्यात लवकरच अत्याधुनिक कारागृहे उभारणार : मुख्यमंत्र्यांची माहिती