देवेंद्र फडणवीसांना ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रिपद हवं; मित्रपक्षांची संमती मिळाली तर…

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. महायुतीमध्ये (mahayuti)सत्तास्थापन, मंत्रिमंडळ वाटप आणि विस्तार अशा सर्वच मुद्द्यांवर जोरदार राजकारण रंगले. महायुतीमध्ये तिन्ही पक्षातील अनेक जेष्ठ नेते नाराज आहेत.

मंत्रिमंडळामध्ये (mahayuti)संधी न दिल्यामुळे छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, दीपक केसरकर असे अनेक नेते नाराज आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या एका आठवड्यानंतर खातेवाटप करण्यात आले. त्यानंतर आता सर्व नेत्यांना पालकमंत्रिपदाच्या वाटपाची प्रतिक्षा लागली आहे. अनेक नेत्यांनी याबाबत इच्छा व्यक्त केलेली असताना याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे.

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील पाच वर्षांसाठी त्यांच्या डोक्यामध्ये असलेल्या विकासकामांचा आराखडा एकप्रकारे सादर केला. तसेच विदर्भातील सिंचन प्रकल्प व नदीजोड प्रकल्प याबद्दल देखील देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर मत मांडले आहे. यावेळी त्यांना पालकमंत्रिपदाच्या वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री हवे असल्याचा प्रश्न देखील विचारण्यात आला.

देवेंद्र फडणवीस पालकमंत्रिपदाबाबत बोलताना यांचा निर्णय त्यांच्या युतीमधील इतर नेते घेणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘”पालकमंत्र्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन उपमुख्यमंत्री ठरवतील. मला बीडला पाठवलं तर मी जाईल. खरंतर मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नसतात. पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तरच घेईन,” अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “गडचिरोलीचा विकास होत आहे. नक्षलवाद कमी होत आहे. ज्या भागात आपण जात नव्हतो त्या भागांमध्ये आता खोलवर जाता येत आहे. निकरची लढाई होण्याची शक्यता आहे. यामधून आपण गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचे काम आपण करणार आहोत.

महाराष्ट्राच्या समोर सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. यावर आळा घालण्याचा प्रयत्न असणार आहे. सर्व आवास योजनांमध्ये मिळणाऱ्या घरांना सोलार दिले जाणार आहे. विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न असणार आहे.जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

मागील काही दिवसांपासून बीड व परभणी प्रकरण जोरदार चर्चेत आहे. बीडमध्ये केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे फक्त बीड नाही तर राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.

बीडमध्ये गॅंग ऑफ वासेपूर सुरु असल्याची टीका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यामुळे बीडमध्ये वचक बसवण्यासाठी स्वतः गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपद घ्यावे अशी मागणी केली जात होती. त्यामुळे बीडमध्ये मुंडे परिवारातील पालकमंत्री होणार की मुख्यमंत्री स्वतःच्या ताब्यात हा जिल्हा घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. या पालकमंत्रिपदासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

हेही वाचा :

“मला शिंदेंनी विभागाची ऑफर दिली होती पण..”, शिवसेना मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

2 बोनस शेअर्स देणार सरकारी कंपनी! जाणून घ्या रेकॉर्ड तारीख …

“‘गल्ली क्रिकेट खेळतोय का?’ रोहित शर्मा यशस्वी जयस्वालवर भडकला, पाहा Video