अखेर फडणविसांच्या मनधरणीला यश, एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!
आज 5 डिसेंबररोजी मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा(political) शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, अजित पवार देखील पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारतील.
यात एकनाथ शिंदे यांना नेमकं कोणतं पद मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं. एकनाथ शिंदे हे गृहखात्याच्या मागणीवर अडून बसल्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी लांबल्याचं म्हटलं गेलं. त्यामुळे फक्त फडणवीस आणि अजित पवार हेच शपथ घेणार की काय?, अशा चर्चा होत्या.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे(political) यांची मनधरणी करण्यात अखेर यश मिळालं आहे. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास राजी केल्याचं सांगितलं जातंय. शिंदे गृहमंत्रीपदाबाबत निर्णय झाल्याशिवाय मंत्रिमंडळात सहभागी व्हायला तयार नव्हते. मात्र, तुमच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी गळ देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना घातली असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बुधवारी वर्षा बंगल्यावर दोनवेळा बैठक झाली होती.यावेळी एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना, मी तुमच्या नेतृत्त्वाखाली काम करायला तयार असल्याचे सांगितले. तसेच, शिंदे गटाला महसूल खाते मिळणार असल्याची देखील चर्चा आहे.
तसेच आज फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. आज केवळ तिघांचा शपथविधी होईल. संध्याकाळी कैबिनेट बैठक होईल, त्यात पुढचे निर्णय होतील, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती असणार आहे. तसेच, काही राज्यांचे मुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काही नेत्यांना देखील सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण देण्यात आलंय.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांसह साधू संत व महतांचीही उपस्थिती असेल. भगवानगडाचे नामदेव शास्त्री महाराज, राधानाथ स्वामी महाराज, गौरांगदास महाराज , महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, कीर्तनकार प्रसाद महाराज अंमळनेरकर यांची सोहळ्याला उपस्थिती असणार आहे.
हेही वाचा :
राज्यात नव्या सरकारचा आज ग्रॅंड शपथविधी सोहळा
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार का? अजित पवारांनी केलं मोठं विधान
Pushpa 2 ची क्रेज की वेडेपणा? अल्लू अर्जुनसमोरच लाठीचार्ज, चेंगराचेंगरीत अनेक जखमी; Video