स्वयंपाक सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट; घर जळून खाक
कराड : स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन सिलिंडरचा(Gas cylinder) स्फोट झाला. विंग (ता. कराड) येथे रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला आग लागली. यात सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विंग येथील पाणंद नावच्या परिसरात तानाजी पांडुरंग कणसे यांचे राहते घर आहे. त्यांच्या घरात रविवारी सकाळी आठच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानक धूर येऊ लागला. घरात असलेले तानाजी कणसे, त्यांची पत्नी, दोन मुले व वृद्ध आई घरातून बाहेर पळाले. त्यानंतर काही वेळातच सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.
हा स्फोट एवढा भीषण होता की, यामध्ये सिलिंडर(Gas cylinder) तब्बल २५ फूट हवेत उडाले. या घटनेनंतर तलाठी फिरोज आंबेकरी, क्लार्क संजय पाटील व अमोल चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये तब्बल सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कणसे यांचे घर जळून खाक झाले होते. या आगीत रोख रकमेसह सोने व संसारोपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले. वेळीच घरातील सर्वजण बाहेर पळाल्याने मोठा अनर्थ टळला.
स्वयंपाकाचा गॅस म्हणजेच एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) केवळ घरे आणि हॉटेल्सचा भाग नाही, तर तो रस्त्यावरील भोजनालये, कारखाने, मॉल्स व कॅन्टीन असलेल्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये सर्वव्यापी आहे.
अनेकांना गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापराविषयी माहिती नसल्यामुळेदेखील अशा घटना घडतात. चुकीच्या पद्धतीने उपकरणे लावण्यात येणे किंवा खराब झालेली उपकरणे बसविणे यांमुळेदेखील अनेकदा घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट होतो. एलपीजी सिलिंडर सतत प्रचंड उष्णतेच्या किंवा आगीच्या संपर्कात राहिल्यास त्याचा स्फोट होऊ शकतो.
त्यासह स्फोटाचे प्रमुख कारण म्हणजे सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून गॅस गळती होते आणि हा गॅस हवेत मिसळून ज्वलनशील मिश्रण तयार करतो. त्यामुळे स्फोट होण्याचा धोका निर्माण होतो. बहुतेक प्रकरणांमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट होत असल्याचे लक्षात आले आहे. आगीची एक ठिणगी ज्वलनशील एलपीजी व हवेचे मिश्रण प्रज्वलित करते आणि त्यामुळे स्फोट होतो. असे स्फोट सामान्यतः लोक जेव्हा सावध नसतात तेव्हा होतात.
हेही वाचा :
उद्धव ठाकरे अॅक्शनमोडवर! लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुकंप होणार; छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार…?
डबल धमाका! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Apple चा हा iPhone