शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, दिवसाही अखंडित वीजपुरवठा मिळणार
मुंबई: शेतकऱ्यांसाठी(farmer) मोठी दिलासादायक बातमी आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीजपुरवठा मिळावा यासाठी शिंदे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करत त्याची व्याप्ती वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाने रविवारी मान्यता दिली आहे.
या योजनेतून १६ हजार मेगावॉट विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या उद्दिष्टास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी चालू असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० च्या माध्यमातून, २०२५ पर्यंत सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट वाढवण्यात आले आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे.
या योजनेअंतर्गत २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीसाठी २ हजार ८९१ कोटी रुपये अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये वीज उपकेंद्रांची देखभाल, सुधारणा, प्रोत्साहनात्मक आर्थिक साह्य, आणि ग्रामपंचायतींना प्रोत्साहन यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या केंद्रीय आर्थिक साह्य निधीच्या धर्तीवर राज्य सरकारकडून सौर ऊर्जा निर्मितीकरिता ३० टक्के आर्थिक साह्य निधी देण्यास मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीत एकूण १० हजार ४१ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ सुरू करण्यात आली आहे, ज्याद्वारे ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाणार आहे. या योजनेमुळे महावितरणचा सरासरी वीजखरेदीचा दर कमी होणार आहे, ज्यामुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शासनावरील आर्थिक भार कमी होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार असून, त्यांच्या कृषी कार्यात मोठी मदत होईल.
हेही वाचा :
राज्यात लागू होणार नवीन पेन्शन योजना: मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
CM शिंदेंच्या PM मोदींकडे पाच मोठ्या मागण्या; शेतकऱ्यांचं टेन्शन मिटणार