एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी गुडन्यूज, महामंडळानं केली सर्वात मोठी घोषणा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रोत्साहनपर योजनेला चालक आणि वाहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारातील २०० चालक-वाहकांना प्रत्येकी दहा टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे.

खासगी वाहतूकदारांच्या स्पर्धेला तोंड देत, एसटीचे(ST) उत्पन्न वाढवण्यासाठी महामंडळाने ही अभिनव योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत, चालक आणि वाहकांना प्रत्येक मार्गासाठी उत्पन्नाचे ठराविक उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे धोरण महामंडळाने आखले आहे.

एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. स्वारगेट आगारातून १ ते १४ जानेवारीपर्यंत १४०, तर शिवाजीनगर आगारातून ६० चालक-वाहकांनी या प्रोत्साहन भत्त्याचा लाभ घेतला आहे. प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी एसटीचे चालक-वाहक जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असून, कर्मचाऱ्यांनाही आर्थिक फायदा होत आहे.

ही योजना प्रायोगिक तत्त्वावर ३१ जानेवारीपर्यंत राबवण्यात येत आहे. प्रोत्साहन भत्ता रोख स्वरूपात देण्यात येत असल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. “दिवसेंदिवस प्रोत्साहन भत्ता घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा फायदा महामंडळ आणि कर्मचारी दोघांनाही होत आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. त्यात या प्रोत्साहन भत्त्याच्या योजनेचाही समावेश आहे. खासगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.

“प्रोत्साहन भत्ता योजना ही महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी आणि कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी उचललेले एक सकारात्मक पाऊल आहे. या योजनेला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ही जमेची बाजू आहे”, असे मत विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

SIDBI कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अजित पवारांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का, पार्थ पवारांना स्थान मात्र मुंडेंना वगळले!

लाडक्या बहि‍णींसाठी गोड बातमी! ‘या’ तारखेअगोदर मिळणार जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे