महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ; ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात(Heavy rain) सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी व हिंगोलीत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने दाणादाण उडवली आहे. जोरदार पावसाने जायकवाडी धरण जवळपास भरले आहे.

जायकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस(Heavy rain) सुरु असल्याने पाण्याची आवक वाढू शकते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या 24 तासासांठी मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. याचबरोबर इतर भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.विदर्भातील अमरावतीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथे आज अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

याचबरोबर धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या मराठवाड्यातील बीड, हिंगोली, परभणी, वाशिम, नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून अनेक भागांतील शेतात पाणी साचलं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान IMD ने आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गसह पुणे, सातारा व घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिली आहे. आज सकाळपासून पुण्यात रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. तर मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात आज विजांचा कडकडाट , मेघगर्जना व ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

आज शेवटच्या श्रावण सोमवारी ‘या’ राशींचं भाग्य उजळणार

‘सायलेंट किलर’ तुमच्याच जवळ! उशीजवळ मोबाईल ठेवून झोपताय तर सावधान

ऐन सणासुदीत महागाईचा तडका; कोथिंबीरच्या एका जुडीला 200 रुपयांचा भाव, तर…