निवडणुका रद्द होणार आधीच माहिती होतं; अमित ठाकरेंचं विधान!

मुंबई विद्यापिठामधील सिनेटच्या निवडणुका(political) ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावरुन सर्वच पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंबरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही या निर्णयावर टीका केली आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या(political) विद्यार्थी आघाडी असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठातील राजकारणामध्ये सक्रीय सहभाग घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी तर सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. हे असं होणार याची आधीपासूनच कल्पना असल्याचा दावा अमित ठाकरेंनी केला आहे.

अमित ठाकरेंनी, ‘मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे ‘फक्त’ रात्रीस खेळ चाले’ या मथळ्याखाली एक सविस्तर पोस्ट आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन शेअर केली आहे. “दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच्या वेळेस एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. ही काही पहिली वेळ नाही.

मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते. आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे, आणि प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे,” असं अमित ठाकरेंनी पोस्टच्या सुरुवातीला आपला संताप व्यक्त करताना म्हटलं आहे.

“मुळात कोणतीही निवडणूक, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, अथवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका असो, या सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आणि परीश्रमांवर लढवल्या जातात. त्यासाठी राजकीय संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे अनेक सहकारी व पदाधिकारी दिवस-रात्र परिश्रम करत असतात.

परंतु, मुंबई विद्यापीठाने जर सिनेट पदवीधर निवडणुका जाहीर करून रद्द करण्याचेच धोरण अवलंबले असेल, तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जाहीर निषेध करते. निवडून आलेले सिनेट सदस्य हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देतात. त्यामुळेच या निवडणुकांचे गांभीर्य विद्यापीठाला लवकरात लवकर समजले तर बरे होईल,” असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

“मागील वेळीसुद्धा जेव्हा विद्यापीठाने निवडणुका रद्द केल्या होत्या, तेव्हा मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या बाबतीत मुंबई विद्यापीठाच्या अनाकलनीय कारभाराचा जाहीर निषेध केला होता. मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून, एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे.

परंतु, त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. म्हणूनच यावेळी जेव्हा मुंबई विद्यापीठाने पुन्हा निवडणुका जाहीर केल्या, त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकांचा सखोल अभ्यास केला आणि निवडणुका कायद्याला धरून नसल्याचे लक्षात आल्याने, त्या पुन्हा पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता आधीच व्यक्त केली,” असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

“माझे सहकारी निवडणूक(political) लढवण्याच्या बाजूने होते. त्यांचा सन्मान राखत, त्यांना विद्यापीठाचा भविष्यातील भोंगळ कारभार समजावून सांगितला आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळेच माझ्या सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परीश्रम वाया जाऊ नयेत, म्हणून आम्ही 22 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. काल मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, हे पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे,” असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

महाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईत भीषण कार अपघात

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य