नाशिक महापालिकेची सिग्नलवरील भिकारी हटाव मोहीम

शहरातील सिग्नलवरील भिकाऱ्यांना पकडून निवारागृहात टाकण्याचा प्रयत्न महापालिकेचा प्रयत्न फारसा यशस्वी ठरू शकलेला नाही. त्यामुळे आता भिकाऱ्यांना थेट त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्याचा फंडा अवलंबिला जाणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाने सिग्नलवरील भिकारी हटाव मोहीम सुरू केली असून या भिकाऱ्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त नितीन नेरे यांनी सांगितले.

शहरात द्वारका, त्र्यंबकनाका, गडकरी चौक, फेम सिनेमा, मुंबई नाका, आदी भागातील सिग्नलवर भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. या भिकाऱ्यांमधील पुरुष वर्गाकडून फारसे काही काम केले जात नसले तरी महिलांकडून गजरे, प्लास्टिक पिशव्या, खेळणी आदी वस्तू विक्री केल्या जातात तर त्यांची लहान मुले व वयोवृध्द व्यक्ती सिग्नलवर भिक मागताना दिसतात. यातील बहुतेक भिकारी व्यक्ती या परप्रांतीय आहेत. काही दिवसांपूर्वी सिग्नलवर भिक मागणाऱ्या सात वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू ओढावल्याची घटना शहरात घडली होती. या भिकाऱ्यांकडून वाहनधारकांची अडवणूक करणे, पैसे न दिल्यास शिवीगाळ करण्याच्या तक्रारीही आहेत. त्यामुळे अतिक्रमण निमूर्लन विभागाने सिग्नलवरील भिकारी हटाव मोहीम सुरू केली आहे.

प्रस्ताव अडगळीत पडण्याची शक्यता
भिकाऱ्यांचे साहित्य जप्त करून त्यांना तपोवनातील महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात स्थलांतरीत केले जात आहे. मात्र, रोज भिक मागून पैसे कमविण्याची सवय झाल्याने सदर भिकारी व्यक्ती पुन्हा सिग्नलवर बस्तान मांडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भिकाऱ्यांना थेट त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्याची प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. अर्थात यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार, मूळ गावी पोहोचविल्यानंतरही ते परत येणार नाहीत याचे उत्तर मात्र महापालिकेकडे नसल्यामुळे पालिकेचा हा प्रस्ताव अडगळीत पडण्याची शक्यताच अधिक आहे.