एलपीजी सिलेंडर 400 रुपयात..!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2024 साठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या कार्यक्रमाला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडूही उपस्थित होते. जाहीरनाम्यात सरकारी आणि गैर-सरकारी क्षेत्रातील तरुण आणि महिलांसाठी 25,000 नोकऱ्या आणि 400 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारपासून अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि अंदमान निकोबारच्या दोन दिवसीय निवडणूक दौऱ्यावर आहेत. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर, जेपी नड्डा गुरुवारी सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा संकल्प पत्र (निवडणूक जाहीरनामा) प्रसिद्ध करतील.

भाजपचे संकल्प पत्र जाहीर करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाल्यास पक्ष विकास, परिवर्तन आणि समरसतेचे प्रतीक असलेल्या डीटीएच मॉडेलवर काम करेल. नड्डा म्हणाले की, पक्ष अरुणाचल गति शक्ती मास्टर प्लॅन लागू करेल. ज्या अंतर्गत राज्यभर रस्ते, रेल्वे आणि हवाई पायाभूत सुविधांना प्रोत्साहन दिले जाईल.

राज्यातील विद्यमान शाळा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचा कॉर्पस फंड स्थापन केला जाईल. नड्डा म्हणाले की, राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचा आणखी एक निधी उभारला जाईल. किसान सन्मान निधी अंतर्गत, शेतकऱ्यांना सध्याच्या 6,000 रुपयांऐवजी 9,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

नड्डा म्हणाले की, भाजपने राज्यातील तरुण आणि महिलांना सरकारी आणि गैर-सरकारी क्षेत्रात 25,000 नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय इटानगरमध्ये आयटी पार्क उभारण्यात येणार असून, त्यातून 2 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. आगामी निवडणुकीत सत्तेत आल्यास राज्यात 400 रुपयांना एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.