मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चुनाभट्टी परिसरातील एका धक्कादायक प्रकरणात, एका सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या जुन्या वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडून मोठा ‘चुना’ लागला आहे. अनेक वर्षांनी त्याला त्याची जुनी वर्गमैत्रीण दिसली. त्याचे लग्न झाले होतेच, पण त्या मैत्रिणीचाही(girlfriend) विवाह झाला होता.
मात्र तरीही दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. आता आपापल्या पार्टनर्सना घटस्फोट देऊया आणि आपण एकत्र राहूया, असे दोघांनीही ठरवले. त्यानंतर त्या इसमाने पत्नीला घटस्फोट दिला आणि त्याच्या वर्गमैत्रिणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला. परंतु, हीच त्याची मोठी चूक ठरली. ज्या महिलेसाठी त्याने आपले कुटुंब सोडले, तीच त्याला फसवून गेली, एका क्षणात त्याचे सगळेच उद्ध्वस्त झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी परिसरातील एका ४८ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने त्याची माजी वर्गमैत्रीण (girlfriend)आणि तिच्या सात साथीदारांविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याचे लग्न २००३ साली झाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये, तो त्याच्या जुन्या वर्गमैत्रिणीला भेटला. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि नंतर त्यांनी आपले आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. यामुळे घरातही भांडणे झाली आणि अखेर २०२१ साली त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला.
घटस्फोट घेतल्यानंतर पीडित व्यक्ती आणि त्याची वर्गमैत्रीण एकत्र लिव्ह-इनमध्ये राहू लागले. दरम्यान, त्या महिलेने घर खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे १५ लाख रुपयांची मदत मागितली. त्याने कोणताही विचार न करता तिला पैसे दिले. यानंतर त्याने तिला तिच्या पतीपासून घटस्फोट कधी घेत आहेस, असे विचारले असता ती टाळाटाळ करू लागली.
यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. मग ती महिला म्हणाली, “आधी तू मला पीएफमध्ये वारस बनव आणि वडिलोपार्जित घर माझ्या नावावर कर. मगच मी तुझ्याशी लग्न करेन.” त्याने असे करण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर ऑक्टोबर २०२४ साली त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत नाते संपवण्याचा निर्णय घेतला.
मात्र, हे नाते संपल्यानंतर २० दिवसांनी, त्या महिलेचा एक मित्र त्याला धमकावण्यासाठी त्याच्या इमारतीत आला, असा आरोप पीडित इसमाने केला. याबद्दल त्याने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडित इसमाच्या सांगण्यानुसार, बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या मित्रासोबत पनवेल महामार्गावर दुचाकीवरून जात होता, तेव्हा प्रियदर्शिनी बस स्टॉपजवळ एका दुचाकीस्वाराने त्याच्या गाडीला धडक दिली. त्याने विरोध केला, तेव्हा त्या महिलेचा मुलगा आणि इतर लोक तिथे पोहोचले.
त्यानंतर त्या महिलेचा मुलगा आणि ७-८ जणांनी मिळून त्या इसमाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे, तर ती महिला देखील तिथे उपस्थित होती आणि तिनेही मारहाण केल्याचा आरोप आहे. हे भांडण आणि मारहाणीदरम्यान पीडित इसमाची सोन्याची चेन, घड्याळ, अंगठी आणि पाकीट गायब झाल्याचाही आरोप करण्यात आला. एवढेच नव्हे, तर पीडित इसमाला जबरदस्तीने ओलीस ठेवून रिक्षातून खाली फेकून दिल्याचा आरोप आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिला, तिचा मुलगा आणि इतर सात आरोपींविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :