राष्ट्रपती मुर्मूच्या अमृतस्नानासाठी 12 तास महाकुंभमेळा रोखला? विरोधी नेत्यांचा आक्रमक पवित्रा

मुंबई : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा(Mahakumbh Mela) सुरु आहे. मागील महिन्यापासून हा मेळा सुरु असून जगभरातून लोक या महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. कोट्यवधी भाविकांनी आणि नागा साधूंनी त्रिवेणी संगमामध्ये अमृतस्नान केले आहे.

त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील गंगेमध्ये स्नान केले आहे. मात्र मुर्मू यांच्या अमृतस्नानामुळे महाकुंभमेळा(Mahakumbh Mela) रोखण्यात आला होता असा गंभीर आरोप केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हीआयपी अमृतस्नानावरुन योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या त्रिवेणी संगमावरील अमृतस्नानावर आक्षेप घेत यामुळे चार कोटी भाविकांना संगमावर जाऊ दिले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाकुंभात स्नान करण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू आल्यानंतर कुंभमेळा इतरांसाठी थांबवण्यात आला.

कोट्यवधी लोकांना रोड अ‍ॅरेस्ट करण्यासारखा प्रकार घडला आहे. त्यांना एक इंच पुढे जावू दिले नाही. सोमवारी राष्ट्रपतींच्या स्नानामुळे 12 तास महाकुंभमेळा रोखून धरला होता. त्रिवेणी संगमावर कोणाला जावू दिले नाही. तीन ते चार कोटी लोक तेथे होते,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, “भाजपने कुंभमेळ्यात केलेल्या व्हीआयपी कल्चरचा फटका भाविकांना बसत आहे. दुसरीकडे विमान कंपन्या लूट करत आहेत. रेल्वेत जागा नाही. रिक्षावाले लूट करत आहे. हा काय कुंभमेळा आहे का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला आहे.

पुढे त्यांनी महाकुंभमेळ्यामध्ये प्रवाशांची व भाविकांची लूट सुरु असल्याचे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “प्रयागराजमध्ये भाविकांची लूट सुरु आहे. १५-१५ तास लोक रस्त्यावर उभे आहेत. रेल्वे आणि विमानात प्रवाशांना जागा मिळत नाही. तिकिटांचे दर प्रचंड वाढले आहे. जगभरातून हिंदूंना आमंत्रण दिले आहे. सोमवारी राष्ट्रपतींचे स्नान होते. त्यामुळे १२ तास कुंभमेळ्यातील स्नान रोखले होते.

राष्ट्रपतींना स्नानासाठी १२ तास लागतात का? त्याकाळात भाविकांची प्रचंड झाले. कोट्यवधी लोक रस्त्यावर होते. कुंभमेळा हा राजकीय सोहळा करुन टाकला आहे. त्यामुळे हिंदूंचे सरकार निवडणाऱ्यांनी ही परिस्थिती पाहिल्यावर विचार करायला हवा,” अशा कडक शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या माजी मंत्री तानाजी सावंत आणि त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत हे चांगलेच चर्चेत आले आहेत. मुलगा ऋषिराज सावंत यांचे अपहरण केल्याची अफवा पसरली. यामुळे चर्चांना उधाण आले होते. यावर आता खासदार राऊतांनी तुफान टोलेबाजी केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात खंडणी, अपहरणाच्या घटना घडत आहेत.

दुसरीकडे श्रीमंतांची मुले बँकॉकला पळून जाताय, ऋषिकेश खासगी विमानाने बँकॉककडे निघाला होता. शिवभोजन थाळी योजना सरकार बंद करत आहे. गरीबांच्या योजना बंद करत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठीही सरकार काहीच करत नाही. सरकारकडे शेतकऱ्यांसाठी ठोस योजना नाहीत. राज्यातील सोयाबीन उत्पादक हवालदील आहे,” अशा शब्दांत खासदार राऊत यांनी टीका केली आहे.

हेही वाचा :

 बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात…

मुख्याध्यापक आणि शिक्षकामध्ये राडा, १८ सेकंदात मारल्या २५ थोबाडीत, Video

Jio देत आहे फ्री Set-Top-Box! लाइव्ह टीव्ही चॅनेलसह मिळेल नेटफ्लिक्सचा आनंद

एकनाथ शिंदेंच्या 3 योजना बंद करण्याचा विचार; महायुतीमध्ये काय घडतंय?