माझा निर्णय झाला; बीडमधून लोकसभा लढवणार
दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून आज पुन्हा ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ज्योती मेटे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाल्या ज्योती मेटे?
“विनायक मेटे यांची आपल्याला कारकिर्द माहित आहे. साहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केले आहे. मराठा आरक्षणच्या बैठकीला येताना हा अपघात झाला आहे. मराठा समाजाचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडलं आहे. मराठा आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण हे काम साहेबांनी केले. साहेबांनंतर आता मी बीड मधून निवडणूक लढवावी असे कार्यकर्ते आणि लोकांना वाटतं आहे,” असे ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या.
तसेच “शरद पवार यांनी विचारांना केली असता आम्ही पुढे गेलो. चर्चा चांगली सुरु आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या निर्णयाने मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. माझं नाव लिस्टमध्ये असेल की नाही हे पक्ष ठरवेल,” असेही ज्योती मेटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
“राष्ट्रवादीकडून जर उमेदवारी दिली नाही तर शिवसंग्रामकडून निवडणूक लढणार का? हे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी बोलून ठरवणार आहे. मी फक्त बीडमधून लढण्यास इच्छुक आहे. मला जनतेने पुढे आणलं आहे. कोणत्याही पक्षाकडून नाही मिळाली तरी ज्योती मेटे या बीड मधून उमेदवार असणार आहेत,” असेही त्या यावेळी म्हणाल्या.