सर्व्हर डाउनमुळे ‘नारी शक्ती ऍप’ ठप्प; महिलांमध्ये संताप
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी लागणारे ‘नारी शक्ती ऍप’ सर्व्हर (server)डाउनमुळे सुरू होत नाही, त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरण्याचे काम ठप्प झाले आहे. ज्यांचे या योजनेचे अर्ज अद्याप भरणे बाकी आहे, अशा महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
जिल्ह्यासह राज्यात महिनाभरापासून अंगणवाडी ताई, ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिका मार्फत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही महिलांचे अर्ज स्वतःच्या मोबाईलवरूनही भरले जात आहेत. या योजनेसाठी स्वतंत्र विकसित केलेले ‘नारी शक्ती ऍप’ दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊनमुळे सुरू होत नाही. परिणामी अर्ज भरण्याचे काम ठप्प झाले आहे. रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, ३१ ऑगस्टपर्यंत मुदत असल्याने अद्याप अनेक महिलांचे अर्ज भरणे बाकी आहे. शासकीय लाभ आपल्यालाही मिळावा, यासाठी महिला प्रयत्नशील आहेत. अशात अर्ज भरण्याचे संकेतस्थळच बंद राहिल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
इंग्रजीत अर्ज भरण्याचा फटका
‘लाडकी बहीण योजने’च्या अर्जातील प्रश्नांमध्ये मराठीतून असल्याने ती मराठीतून भरण्यात आली आहे. मात्र, ‘आता इंग्रजीमधून अर्ज भरा’, अशा सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात येत आहेत. आधीच ही योजना सुरू झाल्यापासून विविध निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यातच आता इंग्रजीत अर्ज भरण्याचा फटका आल्याने अंगणवाडी सेविका गोंधळून गेल्या आहेत. दरम्यान, अनेक सेविकांना इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याने अर्ज भरताना इंग्रजी भाषातज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा:
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन राशींना कसा असेल ६ ऑगस्ट २०२४चा दिवस
सांगलीचा पूरधोका टळला, विसर्ग कमी झाल्याने नद्यांतील पाणी ओसरले
विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना ठाकरे गटाचा पाठिंबा; निवडणुकीची समीकरणे बदलणार