गेल्या वर्षी कांदा(onion)-बटाट्याच्या किमती वाढण्यामागे हवामान बदल हे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की २०२४ मध्ये भारतात असामान्यपणे तीव्र उष्णतेमुळे अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कांदा आणि बटाट्याच्या किमती ८० टक्क्यांहून अधिक वाढल्या.
बार्सिलोना सुपरकॉम्प्युटिंग सेंटरचे मॅक्सिमिलियन कोट्झ यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. युरोपियन सेंट्रल बँक, पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च आणि यूके फूड फाउंडेशनचे संशोधक देखील या अभ्यासात सहभागी होते. २०२२ ते २०२४ दरम्यान १८ देशांमध्ये अति उष्णता, थंडी आणि पावसामुळे अन्नधान्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा अभ्यास या अभ्यासात करण्यात आला.
संशोधकांनी सांगितले की, “गेल्या वर्षी मे महिन्यात भारतात झालेल्या अति उष्णतेमुळे त्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कांदे (onion)आणि बटाट्याच्या किमती ८० टक्क्यांहून अधिक वाढल्या. हवामान बदलामुळे तो महिना १.५ अंश सेल्सिअसने अधिक उष्ण होता आणि त्याचाच परिणाम कांदा आणि बटाट्यावर झालेला दिसून आला”
२०२४ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते आणि जागतिक सरासरी तापमान औद्योगिक पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने जास्त असलेले पहिले वर्ष होते. मे २०२४ मध्ये भारतात झालेल्या अति उष्णतेमुळे पीक उत्पादन आणि पुरवठा साखळींवर गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे भाज्यांमध्ये महागाई वाढली आणि यामुळेच भाज्यांच्या किमतीवर परिणाम झालेला भारतात दिसून आला. या अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की अशा अन्न महागाईचा केवळ आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकत नाही तर आर्थिक असमानता देखील वाढू शकते.
ऑक्टोबरमध्ये अन्न आणि पेय पदार्थांचा महागाई दर ९.६९% होता, जो नोव्हेंबरमध्ये ८.२% पर्यंत कमी झाला. RBI च्या अंदाजानुसार, सीपीआय चलनवाढ ५.७% राहण्याची अपेक्षा होती. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमतीत हंगामी घट आणि खरीप पिकांच्या आगमनामुळे चौथ्या तिमाहीत अन्न महागाई कमी होण्याची अपेक्षा होती आणि तसंच घडलं. आरबीआयने म्हटले होते की रब्बी पिकांच्या उत्पादनासाठी मातीतील ओलावा आणि जलाशयाची पातळी चांगली चिन्हे आहेत आणि जानेवारी-मार्च २०२५ च्या तिमाहीत महागाई ४.५% राहण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी ही स्थिती होती आणि आता यावर्षी पावसाळ्यात पुन्हा एकदा महागाई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा :