राज्यात पावसाने(Rain ) जोरदार हजेरी लावत नागरिकांना अक्षरशः अडकवले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, बीड, अकोला, जालना, यवतमाळ, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
हवामान खात्याचा यलो आणि ऑरेंज अलर्ट :
भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, पुणे विभागातील घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार असल्याची शक्यता आहे. ताम्हिणी घाट परिसरात सलग तिसऱ्या दिवशी 280 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, दावडी येथेही 223 मिमी पाऊस झालाय. यामुळे पश्चिम घाटातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
पुण्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा(Rain) जोर कायम असून, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 18 हजार क्यूसेक्सने सुरु असलेला विसर्ग 22 हजार क्यूसेक्सपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत.
मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत :
राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस असला तरी मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. विशेषतः बीड, जालना, हिंगोली या जिल्ह्यांत पावसाचा पुरेसा भरणा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. काही भागांत मात्र नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे.
गोंदिया जिल्ह्यात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे(Rain ) 5 घरांचे संपूर्ण आणि 364 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. 135 गोठ्यांना देखील नुकसान झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. याशिवाय, पंढरपूर उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. उजनी आणि वीर धरणातून तब्बल 60,000 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले असून नदी दुथडी भरून वाहत आहे.
पुढील दोन दिवस पावसाचा धोका कायम :
हवामान विभागानुसार पुढील दोन दिवस पावसाचा जोर काही भागांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा असून कोकणातही जोरदार सरी कोसळतील. काही ठिकाणी हलक्याशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका अजूनही कायम आहे.
हेही वाचा :