वक्फ विधेयकावरुन समितीमध्ये पहिल्याच दिवशी राडा

नवी दिल्ली : वक्फ(Waqf) विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) ५०० पानी अहवाल तयार झाला आहे. या अहवालावर शुक्रवार आणि शनिवारी अशी दोन दिवसीय बैठक होऊन चर्चा होणार होती. मात्र बैठकीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज (दि.24)शुक्रवारी झालेल्या जेपीसी बैठकीत वक्फ दुरुस्ती विधेयकावर गोंधळ झाला. या गोंधळामुळे, मार्शललाही पाचारण करावे लागले.

खासदार असदुद्दीन ओवैसी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यासह 10 विरोधी खासदारांना जेपीसी सदस्यत्वातून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांचे म्हणणे ऐकले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, वक्फ(Waqf) दुरुस्ती विधेयक, २०२४ वरील संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी झालेल्या या गदारोळावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, “आम्ही सभागृह दोनदा तहकूब केले. कल्याण बॅनर्जी यांनी माझ्याविरुद्ध असंसदीय शब्द वापरले आणि मला शिवीगाळ केली, मी त्यांना ज्यांना आमंत्रित केले होते त्यांना बोलू देण्याची विनंती करत राहिलो.

आम्ही सभागृह वारंवार तहकूब केले पण विरोधी पक्षाच्या खासदारांना बैठक सुरू ठेवायची नव्हती. जम्मू आणि काश्मीरचे एक शिष्टमंडळ बैठकीला आले होते, परंतु विरोधी पक्षाच्या खासदारांनी ओरड आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली. म्हणून शेवटी निशिकांत दुबे यांना प्रस्ताव सादर करावा लागला आणि सर्वांनी त्याला मान्यता दिली, असे मत संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी व्यक्त केले आहे.

भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी देखील झालेल्या या गोंधळावर भाष्य केले आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील जेपीसीच्या बैठकीत झालेल्या गदारोळावर भाजप खासदार अपराजिता सारंगी म्हणाल्या की, “आज आम्ही दोन्ही बाजू ऐकण्यासाठी येथे आलो आहोत, एक जम्मू आणि काश्मीरमधील संघटना होती आणि दुसरी दिल्लीची वकील संघटना होती.

संस्थेचे सदस्य वाट पाहत आहेत. पण तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाचे सदस्य गोंधळ घालत आहेत. ते म्हणाले की, खासदार बॅनर्जी जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यासाठी असंवैधानिक भाषा वापरत आहेत. बैठक दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

भाजप खासदार अपराजिता सारंगी म्हणाल्या की, “८ ऑगस्ट २०२४ रोजी वक्फ दुरुस्ती विधेयकावर जेपीसी स्थापन करण्यात आली. जेपीसीची पहिली बैठक २२ ऑगस्ट २०२४ रोजी झाली. आतापर्यंत एकूण ३४ बैठका झाल्या आहेत. जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी प्रत्येक बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकले. सर्वांच्या मतांचा आदर केला जात होता पण आज तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभापती जगदंबिका पाल यांच्यासाठी असंवैधानिक शब्द वापरले आहेत, असे मत अपराजिता सारंगी यांनी व्यक्त केले आहे.

लोकसभेत सादर झालेल्या वक्फ विधेयकामध्ये ४४ दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. या प्रत्येक दुरुस्तीवर ‘जेपीसी’च्या दोन दिवसांच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र झालेल्या गोंधळामुळे खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करणाऱ्यात आलेल्या खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए. राजा, असदुद्दीन ओवैसी, नसीर हुसेन, मोहिबुल्ला, मोहम्मद अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीम-उल हक आणि इम्रान मसूद यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

नितीश कुमार भाजपचा पाठींबा काढणार? शरद पवारांनी दिली प्रतिक्रीया

अमूलने देशभरात दुधाच्या किमतीत केली कपात, प्रति लीटर 1 रूपया होणार कमी

खुर्चीवर उभं राहून घ्यावी लागली ‘या’ बॉलरची मुलाखत! तो आहे तरी कोण?