संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात

शिवसेनेमुळे मोदींना रस्त्यावर यावे लागले. कितीही सभा घ्या, (meeting)रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

गेल्या एक महिन्यात मोदींनी महाराष्ट्रात 28 सभा घेतल्या. शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावे लागले. कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहणार नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, ही विराट सभा गॅरंटी देतेय राजाभाऊ 100 टक्के दिल्लीला जाताय. विरोधी उमेदवाराला इथे पप्पी घ्यायला पाठवून देऊ. गेल्या दहा वर्षात ज्यांना आपण खासदारकीची संधी दिली त्यांनी काय केले. त्यांना 50 – 100 कोटी मिळाले हा त्यांचा प्रश्न आहे, असा टोला त्यांनी हेमंत गोडसेंना लगावला. 

माझ्या शिवाय देशाला पर्याय नाही ही मोदींची घमेंड

आज मिस्टर फेकू सुद्धा नाशकात होते. भाड्याची माणसे तिथं आली. मोदी भाषण करताना एका तरुणाने प्रश्न विचारला तर पंतप्रधान त्याच्याकडे रागाने पाहत भारत माता की जय म्हणत निघून गेले. मात्र तो शेतकरी रामाचा सुधा आहे आणि भारत मातेचे सुपुत्र आहे. जर तुम्ही काही न बोलता जात असाल तर या थापाड्याची देशाला गरज नाही. माझ्या शिवाय देशाला पर्याय नाही ही मोदींची घमेंड आहे. ती उतरविण्याची वेळ आता आलीय. 

हा महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही

ते पुढे म्हणाले की,  आज नरेंद्र मोदी नाशिकला होते. नंतर कल्याणला गेले. कल्याणमधून आता मुंबईत रोड शो घेतला. अख्खी मुंबई रोड शो साठी बंद करून ठेवण्यात आली. गेल्या एक महिन्यात मोदींनी महाराष्ट्रात 28 सभा घेतल्या. शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावे लागले. कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहणार नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे नरेंद्र मोदींची सभा झाली. तिथे तिथे भाजपचा पराभव होणार आहे. मोदी आले म्हणजे भाजप किंवा गद्दार जिंकले अस होत नाही. 400 जागा  नाही अबकी बार भाजप तडीपार होणार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका 

या राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून नाशिकला आले होते. त्यावेळी 19 बॅगा उतरल्या. 19 बॅगा म्हणजे 19 कोटी रुपये आणले होते. एवढ्या मोठ्या बॅगेत तुमच्या चड्ड्या होत्या का? अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

जे नकली शिवसेना म्हणतात त्यांना नाशिकचा जनसमुदाय दाखवून द्या

मी एक गॅरंटी देतो की, मोदी 4 जून नंतर पंतप्रधान राहणार नाही. भ्रष्टाचाराचा वापर करून त्यांनी पक्ष फोडले. त्यामुळे त्यांच्या सत्तेला सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आमचं चिन्ह काढले मात्र यावेळी मशाल जिंकणार आहे. जे नकली शिवसेना म्हणतात त्यांना नाशिकचा जनसमुदाय दाखवून द्या, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा