Champions Trophy 2025 च्या सुरक्षेची ‘ऐशी की तैशी’ उद्घाटन सोहळ्यातच क्रिकेटप्रेमींचा हैदोस

क्रिकेटप्रेमींचा(Champions Trophy) उत्साह अनेक प्रसंगी ओसंडून वाहतो, मग तो चित्तथरारक सामना असो किंवा मग एखादा दमदार कामगिरी करणारा खेळाडू असतो. हे चाहते कायमच या मंडळींना उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसतात. काही प्रसंगी मात्र चाहत्यांचा हाच उत्साह महागातही पडतो असं म्हणणं गैर ठरणार नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नं नुकतंच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी(Champions Trophy) तीन विविध उद्घाटन सोहळ्यांचं आयोजन केलं होतं. त्यापैकी पहिला सोहळा 7 फेब्रुवारी रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये, दुसरा 11 फेब्रुवारी रोजी कराची नॅशनल स्टेडियममध्ये आणि मुख्य उद्धाटन समारंभ 16 फेब्रुवारी रोजी लाहोरच्याच हजुरी बाग इथं आयोजित करण्यात आला.

याच सोहळ्यांमधील कराचीतील समारंभात इतक्या मोठ्या संख्येनं चाहत्यांनी गर्दी केली, की संपूर्ण व्यवस्थापनच कोलमडून गेलं. व्यवस्थापनाचा अभाव असल्यामुळं इथं अनेकांनीच भिंती ओलांडत आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर या क्षणांचे अनेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले.

इथं आयसीसीच्या या मोठ्या आणि अतीव महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कराची नॅशनल स्टेडियममध्ये अनेक बदल करत अद्ययावत सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. एलईडी लाईट म्हणू नका किंवा मग डिजिटल स्क्रीन म्हणू नका या साऱ्याचाच समावेश होता. पण, 11 जानेवारी रोजी इथं आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यादरम्यान अनेक क्रिकेटप्रेमींनी प्रवेशाची तिकीट न काढताच आतमध्ये येण्यासाठी धुडगूस घातल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे पीसीबीकडून हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठीचे प्रयत्न केले जात असतानाच तिथं या संपूर्ण प्रकारामुळं आता व्यवस्थापनावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या मते या कार्यक्रमासाठी अनेक व्हीआयपी व्यक्तिंनीही हजेरी लावली होती. ज्यामुळं इथं सुरक्षिततेच्या ढिसाळ कारभारावर आता अनेकांनीच नाराजीचा सूर आळवला आहे. @gharkekalesh या X अकाऊंटवरून कराचीतील ही दृश्य जगासमोर आणण्यात आली. हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेल्या या व्हिडीओमध्ये व्हीआयपी एंट्रीला घडलेला प्रकार दाखवल्यानं आता नियोजनाच्या कल्पनेनंच अनेकांना धडकी भरत आहे.

दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील कराचीमध्ये खेळवला जाणार असून, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम सामन्यात धडक मारल्यास दुबईमध्ये सामन्याचं आयोजन केलं जाणार आहे.

हेही वाचा :

अंडी उकडण्याची योग्य पद्धत कोणती? शास्त्रज्ञांनी सांगितली शास्त्रशुद्ध पद्धत

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अपघातात मृत्यू

…म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका