महायुतीत शिंदेंची ‘पॉवर’ वाढली, तर महाविकास आघाडीत शरद पवारांचंही शतकी टार्गेट

मुंबई : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सगळ्यांचेच लक्ष लागले ते राज्याच्या विधानसभा निवडणुकांकडे(target). महायुती असो की महाविकास आघाडी असो जागा वाटपावरून सध्या या दोन्ही आघाड्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कुठे रस्सीखेच तर कुठे सामंजस्य भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची(target) बार्गेनिंग पॉवर वाढली असून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा शरद पवारांच्या अनुभवांची खेळी होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीतील जागावाटपक नेमकं कसं होतं, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनी रामदास कदम यांनी जाहीर भाषणातून 100 जागांची मागणी केली. महायुतीत जागा वाटपाबाबत अजून चर्चा देखील सुरू झालेली नसताना रामदास कदम यांचं हे विधान चांगले चर्चेत आले. दोन वर्षांपूर्वी ठाकरेंच्या सरकारला धक्का देत राज्यात शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र आले सरकार मध्ये बसले. त्यानंतर, त्यांच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेसनेही सत्तेत सहभागी होऊन समर्थन दिलं.

मात्र ,आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांच्या शिवसेनेतून 100 जागांची मागणी करण्यात आली आहे. आम्ही जागावाटपात विधानसभेच्या 100 जागा मागितल्या आहेत. त्यातल्या आम्ही 90 जागा जिंकू, ही आमची विनंतीवजा मागणी असल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागांवर यश मिळालं. तर भाजपने 9 जागा जिंकल्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा जिंकता आली. महायुतीचे हे आकडे बघता सध्याच्या घडीला महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेचे बार्गेनिंग पॉवर वाढल्याचे पाहायला मिळते. त्याचमुळे आता लोकसभा निवडणुकीचा दाखला देत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भाजपची डोकेदुखी ठरू लागले आहेत.

एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते जाहीरपणे जागा वाटपावर बोलत असताना भाजपकडून मात्र सावध पवित्रा घेतला गेलाय. भाजप आमदार नितेश राणे यांनी रामदास कदम हे ज्येष्ठ नेते असल्याचे म्हणत महायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणे असे बोलू नये. आमचे नेते एकत्र बसून याचा निर्णय करतील असे म्हटले. तर, प्रवीण दरेकर यांनी देखील हा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे सांगत बोलण टाळले.

एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून आतापासूनच रस्सीखेच(target) सुरू असताना महाविकास आघाडी मात्र सावध भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या जागा वाटप संदर्भात महाविकास आघाडीमध्ये अद्याप कुठलीही प्राथमिक सुद्धा चर्चा झालेली नाही. त्यामुळे कोणी किती जागा लढवायच्या हे अद्याप ठरलेलं नाही. जिथे ज्याचा चांगला आणि ताकदीचा उमेदवार ती त्या पक्षाची जागा अशाप्रकारे जागावाटप केलं जाईल. त्यामध्ये अंतिम निर्णय महाविकास आघाडीची समन्वय समिती आणि प्रमुख नेते घेतील, असे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

तर, पुण्यात आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो, असे विधान शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे. एकत्रित राहिलो म्हणून यश मिळाल असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले. म्हणजेच आपला प्रदीर्घ अनुभव पणाला लावून पवारांनी लोकसभा निवडणुकांत राजकीय खेळी केली, तीच पुनरावृत्ती आता विधानसभेतही दिसून येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये एक आठवडा विधानसभा निहाय बैठका आयोजित करण्यात आल्या असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभानिहाय विविध सेलकडून विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शंभर जागा लढण्यासंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100 विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीत मोठा भाऊ ठरलेल्या काँग्रेसने सद्या तरी जागा वाटपाबाबत काही ठरले नसल्याचे सांगत आमचा उद्देश भाजपमुक्त महाराष्ट्र असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, जागावाटपात काँग्रेस सामंजस्य भूमिका घेऊन महाविकास आघाडीतूनच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करेल, असेच दिसून येते.

एकूणच काय, महायुती असो वा महाविकास आघाडी विधानसभेच्या जागा वाटपावरून सर्वच पक्षांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. जागा वाटपासोबतच महायुती आणि महाविकास आघाडीला युती टिकवून ठेवावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात महायुती आणि महाविकास आघाडी कशाप्रकारे कोणताही वादविवाद न होऊ देता जागावाटप करेल आणि निवडणुकीला सामोरे जाणार हे पाहण महत्वाचे ठरेल. मात्र, पुढचे काही महिने तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरुन जोरदार चर्चा आणि रस्सीखेच रंगणार हे मात्र नक्की.

हेही वाचा :

सानिया मिर्झा मोहम्मद शमीशी लग्न करणार? टेनिस स्टारच्या वडिलांनी अखेर…

धक्कादायक! भाजप संशयाच्या फेऱ्यात? अध्यक्षांनीच केला भांडाफोड

सोनाक्षी सिन्हाचे काय होणार? इस्लाम देशात आंतरधर्मीय विवाह आहे बेकायदेशीर