धक्कादायक! भरदिवसा धावत्या रिक्षात १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग

मुंबईतील वांद्रे परिसरात भरदुपारी धावत्या रिक्षात एका १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एस. व्ही. रोडवरील एका सिग्नलजवळ रिक्षा(rickshaw) थांबली असताना एक अनोळखी तरुण त्यात जबरदस्तीने घुसला आणि त्यानंतर तरुणीवर अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग केला. आरोपीने रिक्षाचालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून रिक्षा न थांबवण्याची धमकी दिली होती.

ही घटना सोमवारी दुपारी घडली. पीडित तरुणी दररोज रिक्षाने(rickshaw) महाविद्यालयात जात असते. बॉस्टन हॉटेलजवळून तिने रिक्षा घेतली होती. मात्र सायबा हॉटेलजवळील सिग्नलवर रिक्षा थांबताच काळ्या शर्टमधील एक तरुण रिक्षात घुसला. त्याने स्वतःला पुढच्याच काही अंतरावर जायचं असल्याचं सांगत जबरदस्तीने बसण्याचा अट्टाहास केला.

शस्त्राचा धाक दाखवत अश्लील वर्तन :
रिक्षाचालक आणि तरुणीने त्याला उतरवण्याचा प्रयत्न केला असता, त्या तरुणाने धारदार शस्त्र काढून दोघांनाही धमकावले. रिक्षा थांबवली तर मारून टाकेल, अशी धमकी देत त्याने चालकाला घाबरवले. रिक्षा सुरू होताच त्याने मागील सीटवर बसलेल्या तरुणीवर अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडत असतानाच तरुणी प्रचंड घाबरली होती. पुढील सिग्नलवर रिक्षा थांबताच तो आरोपी उतरून पळून गेला. या घटनेनंतर ती महाविद्यालयात न जाता थेट घरी परतली आणि कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून आरोपीला अटक :
या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने तपास करून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रासारखी वस्तू देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपीचे वय व पार्श्वभूमी याचा तपास सुरू असून, तो याआधी गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होता का, हे शोधले जात आहे.

या प्रकारामुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कायद्याचा धाक उरलाय का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं असलं तरी अशा घटना रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजनांची गरज आहे.

हेही वाचा :