राज्य परिवहनच्या ताफ्यात तब्बल दीडशे बसेसचा तुटवडा; प्रवाशांची होतीये मोठी गैरसोय
अमरावती : एकीकडे एसटीच्या(buses) ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक गाड्या दाखल होत आहेत; पण सर्वसामान्य प्रवाशांची गरज लक्षात घेता 2019 मध्ये 465 बसगाड्या होत्या. त्या तुलनेत अमरावती विभागाला 145 गाड्यांची कमतरता असल्याने एसटी प्रशासनाला नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे कमी एसटी बसमुळे मात्र प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
अमरावती विभागात राज्य परिवहन महामंडळाचे अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड आणि चांदूर रेल्वे असे आठ आगार आहेत. या आगारांमध्ये 2019 मध्ये 465 एसटी(buses) बसगाड्या होत्या. एप्रिल 2023 मध्ये बसची संख्या 365 वर आली. यामधील तब्बल 100 गाड्यांचे आयुर्मान संपल्याने टप्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात आले. अशातच एप्रिल 2024 मध्ये या एसटी बसची संख्या 326 वर आली आहे.
येत्या मार्च महिन्यापर्यंत एसटी महामंडळाच्या 326 बस गाड्यांपैकी 45 गाड्यांचे आयुर्मान संपल्याने टप्प्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी अमरावती विभागात एसटीच्या ताफ्यात सुमारे 465 एसटी बस होत्या. ती संख्या मार्च महिन्यापर्यंत तरी यापैकी 281 वर येणार आहे. अशातच मागील काही दिवसांपासून बसमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे.
शासनाने एसटी बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यासह अन्य अनेक प्रवासी सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविल्या जात आहेत. परिणामी, एसटी बसकडे प्रवाशांचा ओढाही वाढला आहे. विशेष म्हणजे, एसटी बसचा तुटवडा असल्याने पैसे देऊन रस्त्यावर ताटकळण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.
एसटी गाड्यांची तोकडी संख्या हे महत्त्वाचे कारण आहे. प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच अमरावती विभागाला नव्या गाड्या कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.
महामंडळाकडून तिकिटात सवलत असल्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांची एसटी बसेसना गर्दी होते. महिलांसोबत लहान मुलेदेखील एसटीतून प्रवास करतात. एसटी बसेसची संख्या कमी असल्याने दाटीवाटीने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना प्रवास करावा लागत आहे. गाड्यांची संख्या वाढली नसल्याने प्रवाशांना गैरसोय होत आहे.
एसटी बसमध्ये इंजिन बिघाड, नादुरुस्त, ट्रान्समिशन फेल, एक्सेल तुटणे, सस्पेन्शन आदी समस्या उद्भवत आहेत. याशिवाय खराब रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे गाड्यांना नियोजित वेळेत पोहोचता येत नाही.
हेही वाचा :
मविआचे तीन नेते फडणवीसांच्या भेटीला…
मनसेचे कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंकडून स्वागत