उन्हाळा ठरणार तापदायक..! मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्ण लाटांचा इशारा

यंदाच्या उन्हाळ्यातील मार्च ते मे तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे (temperature)अतिरिक्त महासंचालक डॉ. डी. एस. पै यांनी शुक्रवारी ता. २८ जाहीर केला. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्या. यातच देशाचे किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक होते. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना प्रथम क्रमांकावर आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात १५.०२ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली. यापूर्वी २०१६ मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १४.९१ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती. यातच फेब्रुवारी महिन्याचे सरासरी कमाल तापमान २९.०७ देखील दुसऱ्या सर्वोच्च पातळीवर होते. यापूर्वी २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी २९.४४ अंश सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे. या कालावधीत किमान तापमान देखील सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि (temperature)कर्नाटकच्या उत्तर भागांत उष्णतेचा तीव्र लाटा येण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

तटस्थ ‘एल-निनो’ची शक्यता
विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सौम्य ‘ला-नीना’ स्थिती सक्रिय आहे. मार्च ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये ही स्थिती निवळून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीवर येणार आहे. परिणामी मॉन्सून हंगामात तटस्थ ‘एल-निनो’ स्थिती राहण्याचे संकेत आहेत. हिंद महासागरातील द्वि-धृवीयता इंडियन ओशन डायपोल -आयओडी सध्या तटस्थ स्थितीत असून, पुढील हंगामात ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

मार्चमध्ये तीव्र उष्ण लाटा, अन् पावसाचा अंदाज
मार्च महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी, मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा आणखी वाढणार असून, ९ ते १५ दिवसांपर्यंत (temperature)टिकून राहणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

१९०१ पासूनच्या नोंदीनुसार फेब्रुवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा आतापर्यंत सर्वोच्च पातळीवर होता. कमाल तापमान आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च ठरले. पश्‍चिम किनारपट्टीवरील केरळ, कर्नाटकसह कोकणात उष्णतेची लाट होती. सध्या सौम्य ‘ला-निना’ स्थिती असून, लवकरच तटस्थ ‘एल-निनो’’ निर्माण होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती कायम राहणार असल्याने मॉन्सूनवर कोणताही प्रभाव पडणार नाही.

हेही वाचा :

30 वर्षांनी सोनाली आणि राज ठाकरे दिसले एकत्र

इचलकरंजी पत्नीचा मृत्यू, अन् पतीने घेतली कृष्णा नदीत पुलावरून उडी

तुमच्या मुलीला लग्नात चुकूनही ‘या’ भेटवस्तू देऊ नये, अन्यथा..