शेतातून घरी येताच शेतकऱ्याने सोडले प्राण

छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना समोर आली आहे. शेतातून घरी येताच शेतकऱ्याने (farmer)प्राण सोडले. संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील कवली गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील तापमान प्रचंड वाढले आहे. याचा नागरिकांना त्रास होताना दिसत आहे.

कवली गावामध्ये राहणारे प्रकाश भागवत तराल (६२ वर्षे) असे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. कवली शिवारातील आपल्या शेतामध्ये ते गुरुवारी गेले होते. शेतातून खरीप पूर्व मशागतीची कामे आटोपून ते दुपारी घरी आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागले. घाम फुटून त्यांना चक्कर येऊ लागली. त्यामुळे त्यांना तात्काळ पिंपळगाव (हरे) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पाचोरा येथे हलविताना त्यांचा रस्स्त्यातच मृत्यू झाला.

याप्रकरणी तालुका आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे. तर महसूल विभागाने याची नोंद केली आहे. सोयगाव तालुक्यात आठवड्याभरापासून विक्रमी तापमानाची नोंद होत असताना सलग तीन दिवस ४३ अंशावर असलेल्या तापमानाने गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस ४४ अंशावर तापमानाची विक्रमी नोंद सोयगाव तालुक्यात झाली आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे तालुका आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

पुणे अपघात प्रकरणात रोखठोक प्रतिक्रिया देऊन अजित पवार यांनी मौनव्रत सोडले

डोंबिवलीतील स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू, कंपनीच्या मालकांना अटक

मनोरंजनाचा तडका! ‘या’ आठवड्यात तुमच्या आवडीचे चित्रपट OTT वर होणार रिलीज