धक्कादायक! पत्नीने पतीला साखळीने बांधलं; घरात कोंडून केली मारहाण…
संपत्तीच्या वादातून पत्नीने पतीला तीन दिवस घरात साखळीने बांधून ठेवत मारहाण केल्याची धक्कादायक घटना तेलंगणामधून समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पती -पत्नी म्हटलं की किरकोळ वाद हे आलेच. संसाराचा गाडा हाकताना पती पत्नीमध्ये अनेकदा खटके उडतात अन् ते क्षणात मिटतातही. मात्र तेलंगणामध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. संपत्तीच्या वादातून पत्नीने चक्क तीन दिवस घरात डांबून ठेवत अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय पट्टी नरसिंह आणि त्यांची पत्नी भरतम्मा यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू होता होता. नरसिंहाच्या नावावर असलेल्या जमिनीच्या विक्रीवरून त्यांची दोन मुले आणि दोन मुलांमध्ये वारंवार खटके उडत होते. पतीने पत्नीच्या मालकीच्या जमिनीवर घर बांधले होते. हे घर बांधताना घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने ती जमीन आपल्या नावावर विकण्याचा प्रस्ताव ठेवल्याने त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता.
त्यानंतर नरसिंहाने हे घर विकले. त्यानंतर रागावलेल्या पत्नीला समजले की तिचा नवरा भुवनगिरी जिल्ह्यात राहतो आणि ती त्याला भेटायला गेली आणि त्याला घरी घेऊन गेली. त्यानंतर नरसिंहाला लोखंडी साखळदंडाने बांधून एका खोलीत कोंडून तीन दिवस मारहाण केली. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नरसिंहाची सुटका केली आणि त्यांना पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी महिला आणि तिच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.