MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली पुण्यातील गुरुवार पेठेत ही धक्कादायक घटना घडली. अभिलाषा मित्तल असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने संशय निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला असून खडक पोलिसांनीआत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वसतीगृह चालकाला अटक केली आहे.

अभिलाषा ही मूळची वाशिम जिल्ह्यातील आहे. अभिलाषा मागील महिन्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्यातील गुरुवार पेठेतील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती.तिने 7 एप्रिलला सायंकाळच्या सुमारास आत्महत्या केली. खोलीमध्ये एकटी असताना तिने आतून दरवाजा बंद करुन गळफास घेतला होता. अभिलाषा हिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या यादृष्टीने पोलिस तपास करीत होते.

खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती तेथील वसतिगृह चालक सुनील परमेश्वर महानोर याने तिला अमानत रक्कम मागितली तसेच मारहाण केली याबाबतची तक्रार तिच्या वडिलांनी खडक पोलिसांकडे दिली. त्यानुसार सुनील महानोर याला अटक केली आहे.

सुनील महानोर याने तिला मारहाण केल्यानंतर ती रडत खोलीमध्ये गेली होती. त्यानंतर तिने खोलीच्या दरवाजा लावून घेतला होता. अभिलाषा हिने तिचे वडील महेंद्र मित्तल यांना हॉस्टेल बदलायचे असल्याचे फोनवर सांगितले होते. परंतु ती जीवन संपवेल, असा विचार कोणाच्या मनात आला नाही. याप्रकरणी महेंद्र मित्तल यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.