बत्तीस शिराळ्यात नागपंचमीचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
बत्तीस शिराळा : नागपंचमीच्या निमित्ताने बत्तीस शिराळा येथे मोठ्या उत्साहात पारंपरिक साजशृंगारात नागपंचमी साजरी करण्यात आली. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी महिलांसह भाविकांची मोठी गर्दी जमली होती. आजच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात अधिक उत्साह होता.
दुपारनंतर शहरातील ६५ हून अधिक मंडळांच्या सवाद्य मिरवणुका निघाल्या. प्रतीकात्मक नागप्रतिमांच्या ट्रॅक्टर मिरवणुका पाहण्यासाठी शिराळा पेठेत नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये लागू केलेल्या प्रतिबंधामुळे जिवंत सर्प हाताळणी व पूजा करण्यावर बंदी आली आहे. यामुळे नागपूजेची पारंपरिक प्रथा बंद झाली असून, आता प्रतीकात्मक नागपूजा करण्यात येत आहे. वन विभागाच्या फिरती गस्ती पथकांनी जिवंत सर्प हाताळणी रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या होत्या.
सकाळी मानकरी यांच्या घरातून पारंपरिक वाद्यांच्या साथीने मानाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली, जी अंबाबाई मंदिरापर्यंत पोहोचली. यात्रेच्या दरम्यान, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीसाठी पेठ ते शिराळा मार्ग एकेरी करण्यात आला होता, आणि परतीसाठी ऐतवडे, वशी मार्ग निश्चित करण्यात आला, ज्यामुळे मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यात आली.
हेही वाचा:
शरीरसुखाच्या मागणीला नकार; क्रूर अंत, ९ महिलांचा खून करणारा ‘सायको किलर’ गजाआड
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा अतुलनीय पराक्रम; इंग्रजांनाही थरकाप उडवणाऱ्या शौर्यगाथा