पुण्यातील जलसंपदा कार्यालयात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी

जलसंपदा विभागाच्या गुण नियंत्रण उप विभागाच्या कार्यालयामध्ये चोरट्यांनी चोरी करुन इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरुन नेले. ही घटना 8 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच ते 10 एप्रिल सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान धोबीघाटाजवळ घडली. तर औंध येथील डीपी रोडवर असलेल्या रेमंड कंपनीच्या शोरुममधून चोरट्यांनी रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना मंगळवारी (दि.9) रात्री साडेनऊ ते बुधवार (दि.10) सकाळी साडेदहा या वेळेत घडली.

जलसंपदा विभागाच्या कार्यालयातून 9 हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी आण्णासाहेब गणपती कुंभार (वय 58, रा. बारंगेमळा, धायरी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोबीघाट परिसरात जलसंपदा विभागाच्या गुण नियंत्रण उपविभागाचे कार्यालय आहे. हे कार्यालय सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता कुलूप लावून बंद करण्यात आले. यानंतर चोरट्याने पाठीमागील बाजूच्या खिडकीची जाळी तोडली. खिडकीचे गज वाकवून त्याने कार्यालयात प्रवेश केला. याठिकाणी असलेले विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेल्या. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता कार्यालय उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.

रेमंड शोरूम मधून रोकड लंपास

औंध : औंध येथील डी. पी. रस्त्यावर असलेले ‘रेमंड’ कंपनीचे शोरूम चोरट्यांनी फोडून 38 हजार 634 रुपयांची रोकड लंपास केली. याबाबत मयूर संजय लिंगायत (वय 28, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डीपी रोडवरील रेमंड शोरुममध्ये रेमंड कंपनीने निर्मित केलेल्या विविध प्रकारच्या कपड्यांची विक्री केली जाते. फिर्यादी यांनी मंगळवारी रात्री कामकाज संपल्यानंतर साडेनऊ वाजता दुकान बंद केले. लिंगायत हे बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकान फोडल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. लोखंडी लॉकर तोडून त्यामधील रोकड चोरुन नेली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक राज केंद्रे करीत आहेत.