मविआचे तीन नेते फडणवीसांच्या भेटीला…

मुंबई: महाविकास आघाडीच्या(political leaders) महत्त्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांकडे विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळावे यासंदर्भातील प्रस्ताव मांडला आहे, अशी माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड उद्या होणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीला विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं, असा प्रस्ताव फडणवीसांसमोर ठेवल्याची माहिती आहे.

विधानसभा(political leaders) निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत महायुतीने सरकार स्थापन केलं. सध्या विधानसभेचं विशेष अधिवेशन घेतलं जात आहे. त्यामध्ये २८८ आमदारांनी शपथ ग्रहण केली. त्यानंतर आता विधानसभेच्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यासाठी महायुतीचे राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीचं बहुमत पाहता राहुल नार्वेकर हे बिनविरोध निवडून येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीने फडणवीसांकडे उपाध्यक्षपदाची मागणी केल्याची माहिती आहे.

राहुल नार्वेकरांविरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली होती. मात्र, महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षपदासाठी कोणताही उमेदवार देणार नाही. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद मिळावं असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांसमोर ठेवला आहे.

महाविकास आघाडीकडे ४८ आमदारांची संख्या आहे. त्यामुळे हा विचार करुन विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे महाविकास आघाडीला द्यावे असा प्रस्ताव या नेत्यांनी फडणवीसांसमोर ठेवला. महाविकास आघाडीचे काही वरिष्ठ नेते हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. त्यामध्ये भास्कर जाधव, नाना पटोले, विजय वडेट्टीवर यांचा समावेश होता.

याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. इतकं बहुमत मिळाल्यानंतर प्रथामपरंपरा पुन्हा सुरु करा. १९९९ नंतर विधानसभेचं उपाध्यक्षपद अद्याप देण्यात आलेलं नाही. ती परंपरा पुन्हा सुरु व्हावी हा प्रस्ताव घेऊन महाविकास आघाडीचे तीन नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते, असं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

विरोधीपक्षनेतेपद महाविकास आघाडीला मिळावं यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आम्ही त्यासाठी प्रयत्न करु. तसेच, विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळेल, असा विश्वास आम्हाला आहे, असं आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत.

हेही वाचा :

कन्नडिगांची पुन्हा दडपशाही, बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी

प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडीला ‘दो हंसो का जोडा’ असं का म्हणतात

महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर दावा, 103 जणांना पाठवली नोटीस