कोल्हापूरात थरारक प्रकार: गुप्तधनासाठी खड्डा, मांत्रिक, नरबळीचा संशय
कोल्हापूर : रात्री अकरानंतर अनोळखी लोकांचा गावात शिरकाव… साखर कारखान्यावरील(Kolhapur) कर्मचाऱ्याचा घरात काहीतरी अघोरी प्रकार सुरू असल्याची कुणकुण… नरबळीच्या अफवेने गावातील मुलांना कोणी बाहेर सोडेना… शंकास्पद हालचाली अन् घरातून धूर, धूप, मंत्रांचा आवाज… सरपंचांनी धाडस करून घरात प्रवेश करताच गुप्तधनाच्या लालसेने घरात मोठा खड्डा खोदल्याचा प्रकार समोर आला. मांत्रिकासह साथीदारांची धावपळ उडाली.
‘कोण आहे तो, पकडा रे त्याला’ असे शब्द कानावर पडताच सरपंचांनी तिथून काढता पाय घेत थेट पोलिस ठाणे गाठले. राधानगरी तालुक्यातील कौलव येथे मंगळवारी रात्री घडलेल्या या थरारक प्रकाराने पंचक्रोशी हादरून गेली आहे.
ग्रामस्थांनी सरपंच रामचंद्र कुंभार यांना फोन करून याची माहिती दिली. नरबळीची(Kolhapur) शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. यामुळे सरपंचांनी थेट शरद मानेच्या घरात शिरण्याचे धाडस केले. घराबाहेर थांबलेल्या मानेच्या एका मुलाने त्यांना अडविण्याचा प्रयत्नही केला. पण, त्यांनी थेट घरात प्रवेश करताच अघोरी पूजा व खड्डा खोदाई सुरू असल्याचे पाहिले.
याविषयी विचारणा केली असता शांती सुरू असल्याची बतावणी माने याने केली; पण परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच बाहेर आले. ‘कोण आहे, पकडा रे त्याला’ असे वाक्यही कानावर पडल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यांनी याची माहिती पोलिसपाटील, तंटामुक्ती सदस्यांना देऊन राधानगरी पोलिसांना बोलावून सहा संशयितांना पकडले.
गेले चार-पाच दिवस चर्चा सुरू होती. खड्डे खणणारे, रात्री अकरानंतर येत होते. मंगळवारी सायंकाळी ते सात वाजता आल्याने संशय बळावला होता. अमावास्या अवघ्या दोन दिवसांवर असल्याने वेगवेगळ्या अफवा कानावर आल्याने ग्रामस्थ बैचेन होते. मानेच्या घरातही हळद, कुंकू, टाचण्या मारलेला लिंबू, नारळ असे साहित्य मिळून आल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.
याप्रकरणी कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ यांच्यासह सहा जणांच्याविरोधात कोल्हापूरच्या राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरबळी आणि जादूटोणा कायद्यान्वये या सहाही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधानगरी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
हेही वाचा :
विमानाची चाकं भारताच्या भूमीला लागताच खेळाडूंनी काय केलं?
क्षणात मिळवा कुणाचीही कॉल हिस्ट्री! जिओ अन् एअरटेलने आणलं नवीन फिचर
वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला; वंचितला बाय-बाय करत लवकरच हातात शिवबंधन बाधंणार?