हवामानात अनपेक्षित बदल; दुपारी उकाडा आणि सायंकाळी पावसाची रिमझिम
दिवसाच्या 24 तासांमध्ये हवामानात(weather) सातत्यानं होणाऱ्या बदलांची नोंद मागील काही दिवसांपासून हवामान विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. श्रावणमहिन्याच्या प्रारंभासोबतच राज्यातील हवामानात चांगलेच बदल झाले आहेत. मागील 48 तासांच्या हवामानाचा आढावा घेतल्यास राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे, तर काही भागांमध्ये पावसाच्या सरी रौद्र रुप दाखवू लागल्या आहेत.
विदर्भासह राज्याच्या कोकण आणि घाटमाथ्यांवरील भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून, पुढील 24 तासांसाठी इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 25°C च्या आसपास असेल, असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
हवामानात नेमके बदल का?
महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव आणि ऊन्हाची ये – जा सुरू असण्याची कारणे हवामानातील सातत्यानं होणारे बदल आहेत. सध्या कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानच्या दिशेनं सरकला असून, काही प्रमाणात कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला सक्रिय आहे. तसेच, दक्षिण गुजरात ते केरळपर्यंत किनाऱ्यालगतच्या भागात एक सौम्य कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे.
हेही वाचा:
अजित पवार गटाला दोन आठवड्यांचा वेळ; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
सकाळी चहा-कॉफी ऐवजी रिकाम्या पोटी पाणी प्या, जाणून घ्या फायदे..
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय वस्त्रोद्योगाला संधी, निर्यात वाढण्याची शक्यता.