माईन्सच्या मलब्याखाली दबून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला येथील मॉईलच्या माईन्समध्ये अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. यात मॅगनीजच्या मलब्याखाली दबून एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झालाय. चेतन शिवने (35, रा. चिखला वस्ती) असं मृतकाचं नावं आहे. अचानक झालेल्या या अपघतामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या मृत्यू प्रकरणी मृतकाच्या कुटुंबीयांनी संबंधित मॉईलच्या प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे.

परिणामी, संतप्त कुटुंबीयांनी मृतकाच्या पत्नीला आर्थिक मोबदला आणि नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तसेच लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह मॉईल माईन्स कार्यालयासमोरच ठेवण्यात येणार असल्याचा निर्धार संतप्त कुटुंबीयांनी घेतलाय.

संतप्त कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा
मॉईलच्या माईन्समध्ये झालेल्या अपघाताला सर्वस्वीपणे संबंधित माईन्स प्रशासन जबाबदार असल्याचे मृतकाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांनी आपला रोष व्यक्त करत मृतकाच्या पत्नीला आर्थिक मोबदला आणि नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. त्यासाठी माईन्स कार्यालयासमोर मोठा जमाव जमला असून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह मॉईल माईन्स कार्यालयासमोरून न नेण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे. संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा रोष बघता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माईन्स कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय.

लेखी आश्वासनानंतर वाद मिटला
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी पुढाकार घेत माईन्सच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी माईन्स प्रशासनानं कुटुंबीयांना 21 लाख रुपयांची आर्थिक मदत, कंत्राटदाराकडून एक लाख रुपयांची मदत, तसेच मृतकाच्या पत्नीला माईन्सच्या शाळेत नोकरी तथा मुलांना बाराव्या वर्गापर्यंत मोफत शिक्षण देण्याचं लेखी आश्वासन माईन्स प्रशासनानं दिले आहे. त्यामुळे आता संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह कार्यालयासमोरून मृतदेह उचलून नेत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

तरुणांच्या दुचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर
नातेवाईकाकडे विवाहाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या तरुणांची दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्यालगत असलेल्या मैदानावरील एका खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात एकाच दुचाकीवरील तीन तरुण गंभीर जखमी झालेत. हा अपघात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इथं रात्री घडला. यातील तिघांवरही लाखांदूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी इथं नेत असताना वाटेत दोघांचा मृत्यू झाला तर, एका गंभीर जखमी तरुणावर उपचार सुरू आहे. पीयूष तिरपुडे (24), लक्की नाकतोडे (20) असं मृतकांची नावं असून अर्जुन धोटे (22) असं गंभीर जखमी तरुणाचं नावं आहे.