महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा शिखर असलेल्या आषाढी वारीला यंदा सरकारकडून विशेष महत्त्व देण्यात आले आहे. 6 जुलै 2025 रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने ‘विठ्ठल रखुमाई वारकरी(Warkari )योजना 2025’ लागू करत वारकऱ्यांसाठी मोठी आर्थिक आणि सामाजिक मदतीची घोषणा केली आहे.
या योजनेअंतर्गत, वारीदरम्यान अपघात होऊन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ₹4 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच अपघातामुळे 60% पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास ₹2.5 लाख, आणि 60% पेक्षा कमी अपंगत्व आल्यास ₹74,000 इतकी रक्कम दिली जाईल. ही योजना केवळ आर्थिक सहाय्यापुरती मर्यादित नसून, वारकऱ्यांच्या संपूर्ण सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे.
वारकऱ्यांसाठी इतर महत्त्वाच्या सरकारी योजना :
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन :
14 जुलै 2024 रोजी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री वारकरी(Warkari ) महामंडळ’ स्थापन केलं आहे. यामार्फत पालखी मार्गांवर भूसंपादन, निवारा केंद्र, अन्न, वैद्यकीय सेवा आणि विमा संरक्षण देण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्य आणि सोयीसुविधा पुरवण्यासाठी हे महामंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
दिंडी अनुदान योजना :
वारकऱ्यांच्या दिंड्यांना यंदा सरकारने भरघोस आर्थिक सहाय्य जाहीर केलं आहे. 1109 दिंड्यांना प्रत्येकी ₹20,000 अनुदान दिलं जाणार असून, एकूण ₹2.21 कोटी निधी समाज कल्याण विभागामार्फत वितरित केला जाणार आहे.
टोलमाफी, रेल्वे आणि आरोग्यसेवा :
वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. तसेच, 80 विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून नागपूर-मिरज मार्गावरही चार विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘चरणसेवा’ आणि ‘आरोग्याची वारी’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे आणि वैद्यकीय केंद्रांची उभारणी झाली आहे.
“आरोग्यवारी” उपक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.
पर्यावरणपूरक आणि सुरक्षित वारी :
“माझी वारी, माझा संकल्प” या अभियानाअंतर्गत वारी मार्ग स्वच्छ ठेवण्याचा आणि पर्यावरणसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. वारी मार्गावरील गावांमध्ये मद्य व मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी 6000 पोलिस, 3200 होमगार्ड, आणि ड्रोनद्वारे निगराणी केली जात आहे. पंढरपूरमध्ये स्नानगृह, स्वच्छतागृहे, वॉटरप्रूफ मंडप आणि टोकन दर्शन प्रणालीची सुरुवात झाली आहे.
हेही वाचा :