हॉर्न का वाजवला म्हणून जाब विचारल्याने दोघांवर कोयत्याने वार; आधी शिवीगाळ केली अन् नंतर…

बीड : पिकअपला बुलेट आडवी लावून हॉर्न का वाजवला? या कारणावरून शिवीगाळ करून कोयत्याने हल्ला(attacked) करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बीड शहरातील साठे चौक परिसरात घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात तरूणांवर गुन्हे दाखल झाले. दरम्यान, याप्रकरणातील हल्लेखोरांपैकी एकावर जिल्हा रूग्णालयात तर दुसऱ्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाणप्रकरणी शिवाजीनगर पोलीस पोलीस ठाण्यात अहमद खान लियाकत खान (वय ३७, रा. बालेपीर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘माझ्यासह सादेक खान जफर खान (रा. बालेपीर) आम्ही दोघेजण जीतो पिक अप (एम.एच.१६.सी.डी.८१७८) मधून मासे घेऊन विक्रीसाठी बीडमध्ये आल्यानंतर साठे चौकात पाठीमागून ट्रिपल सीट आलेल्या तिघांनी आमच्या पिकअपला बुलेट आडवी लावून आम्ही हॉर्न का वाजवला? या कारणावरून शिवीगाळ करून त्यातील एकाने लपवून ठेवलेला कोयता काढला.

नंतर आमच्या दोघांच्या पाठीमागे लागला. जीव वाचवण्यासाठी पळत असताना कोयता घेतलेल्या काळ्या रंगाचा शर्ट असलेल्या एकाने माझ्यावर प्राणघातक हल्ला(attacked) केला तर दुसऱ्या एकाने सादेक खान जाफर खान याच्या कपाळावर, डाव्या गालावर कत्तीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या फिर्यादीवरून तीन अज्ञातांवर विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात हल्ला करणारे दोघेजण जखमी झाले असून, त्यांच्या तक्रारीवरूनही यामध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा :