गणरायाला निरोप देताना  बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या बापाचाही बुडून मृत्यू

मावळ : सध्या गणेशोत्सवामुळे भक्तिमय वातावरण आहे. त्यातच अनेक घरातील गणपती मूर्तींचे विसर्जनही(immersion) केले जात आहे. पाच दिवसांच्या गणरायाला गुरुवारी आनंदाश्रूंनी निरोप देण्यात आला. मात्र, याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घरगुती गणपतीचे विसर्जन करताना आधी मुलगा बुडाला. याच मुलाला वाचवताना त्याच्या वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

संजय धोंडू शिर्के (वय 45) आणि हर्षल संजय शिर्के (वय 20) असे बुडून मृत्यू झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत. हे दोघे मावळमधील कडधे या गावातील रहिवासी होते. घरगुती गणपती मूर्तीचे घरामागील खड्यात साचलेल्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी हे बाप-लेक गेले. याच दरम्यान मुलगा डोळ्यासमोर बुडायला लागला. तेव्हा वडिलांनीही पाण्यात उडी मारली. मात्र, यामध्ये दोघेही वाहून गेले. या घटनेने मावळ तालुक्यात एकच चर्चा सुरु झाली.

कडधे गावात हे बाप-लेक घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन(immersion) करण्यासाठी घराजवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या जागेत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात गेले होते. विसर्जनावेळी आपला मुलगा हर्षल बुडत असल्याचे वडिलांना दिसले. त्यावेळी मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी घेतली. परंतु दोघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ टीम, कामशेत पोलिस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग बचाव पथकाने धाव घेतली. त्यानंतर या दोघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

ही घटना कामशेत पोलिसांना कळताच मावळ वन्य जीव रक्षक संस्था आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या सदस्यांनी रात्री उशिरा या दोघांचे मृत्यूदेह पाण्यातून बाहेर काढले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

हेही वाचा:

रोहित-विराटनंतर कोण सांभाळणार भारतीय संघाची धुरा!

राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन

शेअर बाजारात नवा स्कॅम; ‘या’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होतेय फसवणूक