राष्ट्रवादीत फूट पडण्याला कारणीभूत कोण? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडीसंदर्भात अनेक नेते गौप्यस्फोट करत आहेत (windshield). दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपाबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारही काही आमदारांबरोबर सत्तेत सहभागी झाले.
मागील दोन वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं?, याविषयी त्यांनी सूचक विधान केलं. ते एपीबी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
जयंत पाटील काय म्हणाले?
महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरता आहे. यावर जयंत पाटील म्हणाले, “मतदारांमध्ये गोंधळ नाही. मात्र, काही विशेष कारणं घडली आहेत. तपास यंत्रणांचा गैरवापर, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे लोकांनी ठरवलं आहे की केंद्रातील सरकार घालवायचं”, असं जयंत पाटील म्हणाले. केंद्रीय तापास यंत्रणांचा गैरवापर केला जातो, असं विरोधक आरोप करतात मग तुम्हाला कधी धाक दाखवला गेला का? या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “असा एक प्रयत्न झाला. मी पूर्ण एक दिवस तेथे हजरी लावून आलो. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. ती भिती पक्ष बदलण्याएवढी नव्हती”, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.
अजित पवार गट भाजपाबरोबर गेला, त्यांना भिती दाखवली गेली, असं वाटतं का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, “मला माहिती नाही. पण तशी परिस्थिती असण्याचा संभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये एक घोषणा केली. त्यांनी ७० हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आकडा सांगितला. त्यानंतर आमच्यातील काहीजण लगेच तिकडे गेले”, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.
राष्ट्रवादीत फूट पडेल असं कधी वाटलं होतं का?
यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीत फूट पडेल असं कधी वाटलं नाही. कारण शरद पवार यांनी राष्ट्रवादी हे एक कुटुंब म्हणून सर्वांना जपलं. सगळ्यांच्या उणीवा झाकून ठेवण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला. सर्वांना प्रोत्साहन देऊन नवीन नेते घडवण्याचं काम शरद पवार यांनी केलं. मात्र, आमचा पक्ष कोणत्या कारणामुळे फुटला हे सर्वांना माहिती आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी पक्ष फुटीला कोण कारणीभूत ठरलं?
राष्ट्रवादी पक्ष फुटीबाबत जयंत पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिकडे ७० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत विधान केलं. त्यानंतर इकडे हे (अजित पवार गट) भाजपाबरोबर गेले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटीला नरेंद्र मोदी यांची ती गर्जना कारणीभूत ठरली, असं मला वाटतं”, असं ते म्हणाले.
हेही वाचा :
गोविंदाला महापालिकेतील भ्रष्टाचार सांगा; ठाकरे गटाची मागणी
शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची लवकरच होणार नियुक्ती
भाजपला बहुमताचा आकडा गाठणं कठीण…; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा