देवेंद्र फडणवीस यांचा जळगावात विरोधकांवर निशाणा

Devendra Fadnavis targets his opponents in Jalgaon, ‘They are within reach’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जळगावात सभा पार पडली. जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची आज सभा पार पडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच जळगाव जिल्ह्यात पुन्हा भाजप उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “कडाक्याच्या उन्हामध्ये पाच तास सातत्याने तुम्ही या ठिकाणी आपल्या महायुतीला समर्थन देण्याकरता उपस्थित आहात. माझ्या मनात कुठलीही शंका नाही. या दोन्ही आमच्या भगिनी रेकॉर्ड मतांनी निवडून येणार आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आमच्या विरोधकांना असं वाटतं की ग्रामपंचायतची निवडणूक चालली आहे. त्यांना कल्पनाच नाही, त्यांची विचार करण्याची स्थिती, शब्द चांगला नाही पण त्यांची अवकातच तेवढी आहे. ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखं बोलतात. त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्ही पण लक्षात घ्या की ग्रामपंचायतची निवडणूक नाही. ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, महानगरपालिकेचे, नगरपालिकेची निवडणूक नाही. ही विधानसभेची निवडणूक नाही, देशाचा नेता कोण असेल? हे निवडण्याची ही निवडणूक आहे. पुढचे पाच वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा? कोणाच्या हातात तो विकसित होईल? कोणाच्या हातात सुरक्षित असेल? याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“निवडणुकीमध्ये देशामध्ये दोनच पर्याय आहेत. एक पर्याय विश्व गौरव विकासपुरुष नरेंद्र मोदी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती, आमची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई, रयत क्रांती, जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे. राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘मोदींचं इंजिन पावरफुल’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पावरफुल इंजिन आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन, उद्धव ठाकरे आहेत… इंजिन मध्ये सामान्य माणसाला जागा असते. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे. फक्त उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये राऊत नाही त्यांना जागा नाही. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. यांच्या इंजिनमध्ये केवळ यांच्या परिवाराकरता जागा आहे. सामान्य माणसाकरता जागा नाही आणि यांच्याकरता यांचा परिवारच दुनिया आहे. मोदी यांच्याकरता भारत त्यांचा परिवार आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘मुद्दा नाही, फक्त शिवीगाळ’

“या ठिकाणी मतदानाच्या निमित्ताने रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांच्या नावासमोरची कमळाची बटन दाबा. जळगाव जिल्ह्याची बोगी ही मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल आणि विकासाच्या वाटेवर अत्यंत वेगाने त्या ठिकाणी निघेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “गरिबाच्या कल्याणाचा मुद्दा आहे का? शेतकऱ्याच्या कल्याणाचा मुद्दा आहे का? सामान्य माणसाच्या कल्याणाचा मुद्दा आहे का? मुद्दा नाही, फक्त शिवीगाळ आहे, शिवराळ भाषा आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

फडणवीसांनी वाचला मोदींच्या कामांचा पाढा

“नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. हा जगातला रेकॉर्ड आहे. जगामध्ये कुठल्याही देशांमध्ये मात्र 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आजपर्यंत आले नाहीत. मोदीजींनी गेल्या 10 वर्षांमध्ये 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर दिलं. 50 कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस नव्हता. आया-बहिणी चुलीवर स्वयंपाक करायच्या. त्यांना गॅस दिला”, असं फडणवीस म्हणाले.

“आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील घरोघरी पाणी पोहोचलं. बंधू-भगिनींना 55 कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत त्या ठिकाणी मोफत इलाज दिला. 60 कोटी लोकांना तरुणांना मुद्राच्या अंतर्गत लोन दिलं. दहा लाखापर्यंतचा लोन मिळालं. आम्हाला सांगताना आनंद वाटतो या 60 कोटींमध्ये 31 कोटी आमच्या आया-बहिणी आहेत की ज्यांना ते लोन मिळालं आणि ते आपल्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिल्या”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“लाख बचत गट तयार झाली आणि त्याला 8 लाख कोटी रुपये मोदींनी दिले. मोदीजींनी सांगितलं, एकीकडे मुद्राचं लोन दहा लाखावरून वीस लाख होईल आणि आमच्या महिला बचत गटांना ज्या वस्तू त्या तयार करतात त्या वस्तूंकरता एअरपोर्ट असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टॉप असेल, सर्व ठिकाणी त्यांच्याकरता जागा आरक्षित ठेवली जाईल आणि त्यांच्या वस्तूंची विक्री होईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.