नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन

शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. मात्र महायुतीत अजूनही नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या जागेवर मौन बाळगल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात हेमंत गोडसे हेच नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. श्रीकांत शिंदेंच्या घोषणेचा महायुतीतून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर उमेदवारी मिळण्यासाठी हेमंत गोडसे यांनी अनेक वेळा ठाणेवारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळेल असे आश्वासन देण्यात आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मला दिल्लीतून संकेत मिळाल्याचे सांगत नाशिकच्या जागेवर दावा ठोकला. तर भाजपकडून नाशिकमध्ये आमची अधिक ताकद आहे. त्यामुळे नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी केल्याने नाशिकच्या जागेचा तिढा अजून कायम आहे. 

नाशिकच्या जागेबाबत फडणवीसांचे मौन

नाशिकमधून भुजबळ आणि गोडसे या दोघांच्या नावाला विरोध होत असल्याने महायुतीकडून पर्यायी उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. यात भाजपचे आमदार राहुल ढिकले आणि शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव आघाडीवर आहे. त्यातच आज सोलापूर येथे पत्रकारांनी  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या जागेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलणे टाळले. 

महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? 

अलीकडेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यात नाशिकच्या जागेवरून जुंपल्याचे दिसून आले. प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते की, नाशिकची जागा आम्ही मागतोय. शिंदेनी नाशिकची जागा आमच्यासाठी सोडावी. यावर संजय शिरसाट यांनी प्रफुल्ल पटेल यांना नाशिकची जागा हा आमचा आग्रह नव्हे तर हट्ट आहे, नाशिकची जागा शिवसेनेचीच राहील, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या जागेबाबत बोलण्यास नकार दिल्याने महायुतीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महायुतीकडून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.