पालघरमध्ये उष्माघाताने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. राज्यातील उष्णाघाताच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशामध्ये पालघरमध्ये उष्माघाताने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी विनोद रावते असं या मृत मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला चालला आहे. पालघरमध्ये १६ वर्षांच्या विद्यार्थिनीचा उष्माघातामुळे पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरच्या विक्रमगडमधील केव वेडगे पाडा येथे ही घटना घडली आहे. अश्विनी विनोद रावते या मुलीचा दुपारच्या सुमारास उष्माघाताने मृत्यू झाला.

अश्विनीचा मृतदेह शेताजवळ आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे . अश्विनी ही मनोरमधील एस.पी.मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती. अश्विनी आज अकरावीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कोणी नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली होती. तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली. अश्विनीचे शेत हे मूळ गावापासून काही अंतरावर असल्याने तिचा मृतदेह तब्बल दोन तास त्याच ठिकाणी पडून होता .

घरी आलेल्या आई-वडिलांनी अश्विनीचा शोध सुरू केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात सध्या विक्रमगड महसूल विभागाचे अधिकारी यांच्याकडून पंचनामा सुरू आहे. अद्याप अश्विनीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आला नाही. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालघर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.