महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला…
बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आपल्या प्रचार कार्यक्रमात व्यस्त आहेत. आपल्या प्रचारासाठी त्या मतदारसंघातील तालुके आणि गावांतील कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची भेट घेत आहेत. काही ठिकाणी जाहीर सभा तर काही ठिकाणी रोड शो, तर काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करत त्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. याचदरम्यान पंकजा मुंडे ह्या बीडच्या पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे प्रचार कार्यक्रम घेतला. येथे भाषण करत असताना एका महिलेने त्यांच्याकडे बससेवेची मागणी केली.
पंकजा मुंडे भाषणात आपल्या कामाची माहिती देत होत्या. त्या दरम्यान एका महिलेने बीड ते अहमदनगर दरम्यान बसची सेवा सुरू करावी, अशी मागणी केली. स्वर्गीय मुंडे साहेब निवडणूक लढवत असतांना आम्हाला गावखेड्यात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळत नव्हते. मात्र मी ग्रामविकास मंत्री असतांना गावखेड्यात रस्ते दिले, विकास केला..असं महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या.
त्यावेळी भाषण ऐकणाऱ्या महिलेने “ताई तुम्ही आम्हाला रस्ता दिला, आता गाडीही द्या..”, अशी मागणी केली. यावर पंकजा मुंडेंनी पीएला तात्काळ एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन करायला सांगितलं. संबंधित महिलेला लवकर बस देऊ, असं आश्वासन दिलं. मात्र ती गाडी बीडहून नाहीतर अहमदनगरहून सुरू करा. अशी मागणी महिलेने केली. यावर ती देखील बस सुरू करू, असा शब्द यावेळी पंकजा मुंडे यांनी महिलेला दिला.