मिलिंद नार्वेकर यांना महायुतीची मोठी ऑफर; झटका देणार?

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणारी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांना महायुतीने मोठी ऑफर दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर ही ऑफर घेऊन ठाकरे गटाला धक्का देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसं झाल्यास मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाकडे असल्याने मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून लढू शकतात, असंही सांगितलं जात आहे.

दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. अरविंद सावंत यांनी मुंबईत सर्वात आधी प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे त्यांची प्रचाराता आघाडी दिसत असतानाच दक्षिण मुंबईत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे सेक्रेटरी आणि अत्यंत जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर यांनाच उमेदवारी देण्याचा घाट महायुतीत घातला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. त्यासाठी उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. मात्र, नार्वेकर यांच्याकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तीन नेते इच्छुक

दरम्यान, दक्षिण मुंबईतील जागेसाठी महायुतीतील तीन नेते इच्छुक आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे दोन नेते भाजपमधून इच्छुक आहेत. तर शिंदे गटातून यशवंत जाधव हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. या मतदारसंघात यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार आहेत. तर यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यामुळे या तीन नेत्यांपैकी एकाला उमेदवारी मिळते की मिलिंद नार्वेकर शिंदे गटात आल्यास त्यांना उमेदवारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मिलिंद नार्वेकर कोण?

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहे. उद्धव ठाकरे यांची सावली म्हणूनही नार्वेकर यांची ओळख आहे. ते उद्धव ठाकरे यांचे सेक्रेटरी आहेत. जेव्हा जेव्हा शिवसेना संकटात आली तेव्हा तेव्हा नार्वेकर यांनी संकटमोचकाची भूमिका निभावली होती. असं असलं तरी त्यांना वैतागून अनेकांनी पक्षही सोडलेला आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना मिलिंद नार्वेकर यांच्यावरच आरोप केला होता. मिलिंद नार्वेकर यांनीच उद्धव ठाकरे आणि आमच्यात बेबनाव आणला. आमचे फोनही घेतले नाही, असं सांगत राणे यांनी पक्ष सोडला होता. अनेक आमदारांचंही तेच म्हणणं होतं. मात्र, आता तेच नार्वेकर शिंदे गटात आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.