नाशिकची रामरथ मिरवणूक बनली ‘राजकीय आखाडा’
नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामरथ मिरवणुकीला सायंकाळी सहा वाजता सुरुवात झाली असून यंदा भक्तांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. रथयात्रेत लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांसह हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला.
या रथयात्रेमुळे पंचवटीतील रस्ते दिसेनासे झाले असून वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. श्रीराम व गरुड रथ काढण्याची 250 वर्षाची परंपरा आहे. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून ढोल ताशांचा गजर, महाआरती आणि रामनामाचा जयघोष करत रामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली होती.
हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे प्रभू श्रीराम चरणी लीन
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी रथावर जाऊन रामरायाचे दर्शन घेतले. एकीकडे खासदार हेमंत गोडसे हे महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या दोन्ही नेत्यांनी आज रथ यात्रेत सहभागी होत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. आजच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंच्या आशा पल्लवित झाल्या असून तिकीट मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आगामी निवडणुकीत प्रभू श्रीराम कुणाला आशीर्वाद देणार? अशी चर्चा यावेळी नागरिकांमध्ये रंगली होती.
रामाच्या भोगमूर्ती व पादुकांची सवाद्य मिरवणूक
दरम्यान, रथयात्रा सुरु होण्यापूर्वी राममंदिरातून रामाच्या भोगमूर्ती व पादुकांची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. त्यानंतर रामाच्या रथात भोगमूर्ती तर गरुड रथात रामाच्या पादुका ठेवण्यात येऊन आरती केली जाते. रामरथ ओढण्याची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे तर गरुड रथाची जबाबदारी अहिल्याराम व्यायामशाळेकडे असते.
मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांना कडेकोट बंदोबस्त
रथयात्रा पुढे नागचौक, गणेशवाडीपासून गौरी पटांगणाकडे मार्गस्थ होते. या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून महिला भाविक रथाचे स्वागत करत मनोभावे दर्शन घेतात. रथोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.