‘सुपर 50’ विद्यार्थ्यांचा बारावीत डंका;

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Education) इयत्ता बारावीचा निकाल (जाहीर झाला आहे. नाशिक विभागाचा (Nashik Division) निकाल यंदा  94.71 टक्के लागला आहे. तर जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Nashik) सुपर 50 (Super 50) उपक्रमातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. 

सुपर 50 उपक्रम 2022 अंतर्गत निवड झालेले विद्यार्थी 100 टक्के उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 21 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य मिळवले आहेत. तर 29 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

मुलांमध्ये सुशांत बागुल, मुलींमध्ये डिंपल बागुल अव्वल 

सुपर 50 उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी मुलांमध्ये प्रथम क्रमांक सुशांत वाळू बागुल (Sushant Bagul) याने प्राप्त केला आहे. त्याला 84.83 टक्के मिळाले आहेत. तर मुलींमध्ये डिंपल अशोक बागुल (Dimpal Bagul) या विद्यार्थिनीने 80.67 टक्के मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. सुशांत बागुल या विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र विषयात 84 गुण, गणित या विषयात 96 व जीवशास्त्र या विषयात 96 गुण प्राप्त करून तीन विषयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर रसायनशास्त्र या विषयात प्रणव शशिकांत गायकवाड या विद्यार्थ्याने 91 गुण मिळवून यश संपादन केले आहे. सुपर 50 उपक्रमातील 22 विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत यश संपादन केले असून ते आता जेईई अ‍ॅडव्हान्स या प्रवेशासाठी प्रविष्ट होणार आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, गटशिक्षणाधिकारी मीता चौधरी, विस्तार अधिकारी मनीषा पिंगळकर, उपाध्ये क्लासचे संचालक भारत टाकेकर, प्राचार्य संतोष तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.

काय आहे ‘सुपर 50’ उपक्रम? 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना म्हणून सन 2022 मध्ये सुपर 50 उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतल्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांची निवड परीक्षेतून करण्यात येऊन या उपक्रमातून 50 विद्यार्थ्यांना जेईई, सिईटी, जेईई अॅडव्हान्स परीक्षांचे धडे दिले जात आहेत. यंदाच्या वर्षी या उपक्रमांतर्गत दिव्यांगांसह सर्व प्रवर्गातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन या विद्यार्थ्यांना जेईई व नीट या परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे

हेही वाचा :

बारावीत कमी गुण मिळाले? टेन्शन नको! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच आघाडी

45 पैशांत प्रवाशांना 10 लाखांचा विमा; काय आहे रेल्वेचा विमा