वादळी वाऱ्यामुळे महावितरण ला ३० लाखांना फटका

गडहिंग्लज शहरातील काळभैरी रोडवर झाड पडल्याने महावितरणचे दोन खांब कोसळून नुकसान झाले.
वादळी वाऱ्याचा(wind)३० लाखांना फटका
महावितरणचे नुकसान एप्रिल व मेमध्ये कोसळले दीडशेहून अधिक खांब.
गडहिंग्लज, ता. २३ गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत एप्रिल व मे महिन्यात झालेल्या वादळी वारे व पावसामुळे दीडशेहून अधिक खांब कोसळले असून, वीज वाहिन्याही तुटल्या. वीज महावितरणला त्याचा ३० लाखांना फटका बसला आहे. दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर सर्व खांब नव्याने उभे करण्याच्यादृष्टीने काम सुरू केले असून, बहुतांश काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.


यंदा वळीव पावसाने चांगली हजेरी लावली. एप्रिल व मे महिन्यात पावसासह वादळी वारासुद्धा मोठ्या प्रमाणात होता. यामुळे घर, गोठा, शेडवरील खापऱ्या, पत्रे उडून गेले. संबंधित कुटुंबाचे यात मोठे नुकसान झाले. दरम्यान, वादळी वाऱ्याचा मोठा फटका महावितरणच्या मालमत्तेला बसतो. विजेचे खांब कोसळण्यासह वीजवाहिन्या मोठ्या प्रमाणात तुटतात. यंदाच्या दोन महिन्यांतील अशा घटनांमध्ये महावितरणचे दीडशेहून अधिक खांब कोसळले असून, ताराही सर्वाधिक तुटलेल्या आहेत. त्याचे ३० लाखांहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे.

कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांच्या मार्गदर्शनाने गडहिंग्लज, आजरा, चंदगड व नेसरी उपविभागांतर्गत सर्व महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून बहुतांश खांब नव्याने बसवण्यात यश मिळवले आहे. तुटलेल्या ताराही नव्याने जोडल्या. दरम्यान, गडहिंग्लज शहरासह परिसरात काल (ता. २२) पाच मिनिटेच झालेल्या वादळी वाऱ्यात उच्च व लघुदाबाचे २३ खांब एका दिवसात कोसळले आहेत. हे खांब नव्याने बसवण्याचे काम आज दिवसभर युद्धपातळीवर सुरू होते. महावितरणचे कर्मचारी सकाळी आठपासूनच या कामात व्यस्त होते. एप्रिलमध्ये कोसळलेले खांब व तारांचे पुनरूज्जीवन पूर्ण झाले आहे. मे महिन्यात कोसळलेले खांब व तुटलेल्या तारा नव्याने बसवण्याची कार्यवाही बहुतांशी पूर्ण झाली असून, उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे श्री. आडके यांनी सांगितले.
सर्व उपविभागांतील नुकसान असे
-एप्रिल २०२३ : ८१ डांब, ५ कि.मी अंतर तुटलेल्या तारा
नुकसान :१३ लाख ५० हजार
———————————
मे २०२३ : ८९ डांब कोसळले, ६ कि.मी. अंतर तुटलेल्या तारा
नुकसान : १६ लाख ६७ हजार