नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात(political) विविध घडामोडी घडत आहेत. त्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांचे कट्टर समर्थक तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले आता भाजपच्या वाटेवर आहेत. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली होती. आता ते भाजपमध्ये जाण्याच्या विचारात आहेत.
चंद्रशेखर चिखले यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावरून ते भाजपमध्ये(political) जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कोणत्या पक्षात जाणार आहे, याची उकल केली नव्हती. मात्र, त्यांनी काही संकेत दिले होते. त्यावरून ते भाजपमध्ये जाणार असल्याचे मानले जात होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर हे गूढ आता उकलले आहे.
भाजपमध्ये(political) त्यांचा प्रवेश अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नसला तरी, लवकरच ते काही कार्यक्रमात भाजपचे सदस्य होतील, असे बोलले जात आहे. सदिच्छा भेटीदरम्यान परिणय फुके देखील मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते. काटोल जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष नितीन डेहनकर, नरखेड कृउबासचे संचालक मनीष फुके, नागपूर जिल्हा आदिवासी पारधी विकास परिषदेचे अध्यक्ष देशराज पवार यांच्यासह इतर देखील उपस्थित होते.
चिखले हे मेंढेपाठर सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य होते आणि राष्ट्रवादीने त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षही बनवले होते. ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अत्यंत जवळचे होते. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत देशमुख यांनी त्यांच्याऐवजी मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी दिली होती. तेव्हापासून चिखले नाराज असल्याचे समजते. ते दोनदा पंचायत समिती सभापती होते. त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या परिसरात अनेक दशकांपासून सामाजिक आणि राजकीय प्रभाव आहे.
असे असतानाही पुत्रप्रेमापोटी एका चांगल्या कार्यकर्त्याला देशमुख यांनी बाजुला केले. चिखले यांच्यानंतर आता आणखी काही माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी लवकरच त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हे स्पष्ट होईल.
हेही वाचा :