महाराष्ट्रात जीबी सिंड्रोमचा धोका वाढला; रुग्णसंख्या वाढतानाच सांगलीत दोघांचा मृत्यू

सांगली : महाराष्ट्रात सध्या ‘गिलेन बॅरे सिंड्रोम’(syndrome) अर्थात GBS चा धोका वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यात मृतांचा आकडा कमी होताना दिसत नाही. सांगलीमध्ये या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 14 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जीबीएसची लागण झालेले हे दोन्ही रुग्ण मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते.

मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी (जि. बेळगाव) येथील 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील 60 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूरनंतर आता सांगलीमध्येही जीबी सिंड्रोममुळे मृताची नोंद झाल्याने राज्यातील एकूण मृताची संख्या 11 वर पोहचली आहे. सध्या राज्यात विविध रुग्णालयात 20 रुग्ण व्हेंटिलेटर आहेत. सांगलीच्या मिरजमधील शासकीय रुग्णालयात गेल्या 15 दिवसांत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 6 रुग्ण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे.
दरम्यान, सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रुग्ण पुण्याला, तर एक कराडला उपचारासाठी गेला आहे. 15 रुग्णांमध्ये सांगली शहरातील 3 रुग्णांचा समावेश आहे. शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये ‘जीबीएस’चे रुग्ण आढळले होते.

माघी यात्रेनंतर पंढरपुरात जीबीएसचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन्ही संशयित रूग्ण पंढरपूर शहरातील असून, त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे, कराडमध्ये प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. 15 दिवसांत 6 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम(syndrome) चा कहर सतत वाढत आहे. जीबीएस हा नसांशी संबंधित एक गंभीर आजार आहे. जीबीएस विषाणूमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर या विषाणूने आता मुंबईत एका रुग्णाचा बळी घेतला आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर दाखल असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईत जीबीएस संसर्गामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.
जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय नसांवर हल्ला करते. तसेच शरीराचे काही भाग अचानक सुन्न होतात. स्नायू कमकुवत होतात आणि गिळण्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. जीबीएसच्या गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्ण पूर्णपणे अर्धांगवायू होऊ शकतो. हा विकार वृद्ध प्रौढांमध्ये आणि पुरुषांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते, जरी सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो.
हेही वाचा :
१ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य; अन्यथा भरावा लागेल दुप्पट टोल
एक मुलगा, 2 मुली…, भररस्त्यात मुलाचा दोघींसोबत रोमान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
महायुतीनंतर आता महाविकास आघाडीत ‘या’ मुद्यावरून बिघाडी; ठाकरेंना काँग्रेस देणार झटका?