मोठी कारवाई! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ED कडून अटक, दारु घोटाळा प्रकरणी कारवाई

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा आणि उद्योगपती चैतन्य बघेल यांना अटक केली आहे. राज्याच्या दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. ईडी(ED) अधिकाऱ्यांनी पहाटे टाकलेल्या छाप्यानंतर चैतन्य यांना भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेण्यात आलं. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित अनियमिततेच्या चौकशीत ही अटक एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे.

केंद्रीय यंत्रणांमधील सूत्रांनुसार, चौकशीत 1000 कोटींच्या गुन्ह्यातील संशयास्पद रकमेचा शोध लागला आहे. ईडीचा असाही दावा आहे की निधीचा काही भाग चैतन्य बघेल आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी चालवलेल्या रिअल इस्टेट फर्म्सद्वारे लाँडरिंग करण्यात आला होता.

छत्तीसगड भ्रष्टाचार विरोधी ब्युरोने (एसीबी) नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीचा(ED) मनी लाँड्रिंगचा खटला सुरु आहे. यामध्ये राज्याच्या दारू धोरणाशी संबंधित भ्रष्टाचारात कथित भूमिकेसाठी माजी उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा यांच्यासह 70 व्यक्ती आणि संस्थांची नावे आहेत.

अटक आणि छाप्यावर प्रतिक्रिया देताना भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, जेव्हा आम्ही सभागृहात अदानींचा मुद्दा उपस्थित करणार होतो, तेव्हा मोदी आणि शाह यांनी त्यांच्या मालकांना खूश करण्यासाठी ईडीला माझ्या घरी पाठवलं. ते देशभरातील विरोधी नेत्यांना लक्ष्य करत आहेत, लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं बघेल यांनी रायपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

त्यांनी ईडी, सीबीआय, आयकर आणि डीआरआय सारख्या तपास संस्थांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही केला आहे. “निवडणूक आयोग बिहारमध्ये मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवत असून, या संस्थांना विरोधकांवर हल्ला करण्यासाठी शस्त्र म्हणून वापरले जात आहे. तरीही, आम्ही लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि सहकार्य करत राहू,” असं बघेल पुढे म्हणाले.

हेही वाचा :