बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता राकेश रोशन(Rakesh Roshan) यांची प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ते मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या मानेवर तातडीनं अँजियोप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही बातमी समोर येताच, चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू केल्या आहेत.
हृतिक रोशनचे वडील असलेल्या राकेश रोशन(Rakesh Roshan) यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्यामुळे आणि मानेजवळ जडपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने आयसीयू मध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे त्यांच्या मानेवर अँजियोप्लास्टी केली गेली. अँजियोप्लास्टीनंतर आता त्यांची प्रकृती सुधारत आहे आणि त्यांना सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे, अशी माहिती मुलगी सुनैना रोशन हिने दिली.
एका प्रसिद्ध माध्यमसंस्थेशी बोलताना सुनैनाने सांगितलं, “वडिलांच्या मानेतील नसामध्ये ब्लॉकेज झालं होतं, त्यामुळे तातडीनं कॅरोटिड अँजियोप्लास्टी करण्यात आली. आता ते पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांती घेत आहेत. काळजीचं कारण नाही.”
सध्या राकेश रोशन यांच्यासोबत त्यांच्या पत्नी पिंकी रोशन, मुलगा हृतिक, मुलगी सुनैना, आणि हृतिकची प्रेयसी सबा आझाद रुग्णालयात उपस्थित आहेत.
काय असते कॅरोटिड अँजियोप्लास्टी? :
कॅरोटिड अँजियोप्लास्टी ही अशी वैद्यकीय प्रक्रिया असते ज्यात मानेतील कॅरोटिड नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्टेरॉल हटवून रक्तप्रवाह सुरळीत केला जातो. या नसांचा संबंध थेट मेंदूशी असतो. वेळेवर ही प्रक्रिया न केल्यास मेंदूला स्ट्रोकचा धोका वाढतो.
या प्रक्रियेमुळे रुग्णाच्या मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि रक्त पोहोचतं, त्यामुळे गंभीर त्रास टळतो.
दरम्यान, राकेश रोशन यांची सध्या प्रकृती स्थिर असून, त्यांना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या तब्येतीची सतत निगराणी ठेवली जात आहे. चाहत्यांकडून सोशल मीडियावरून “गेट वेल सून राकेश जी” असे मेसेजेस येत आहेत.
हेही वाचा :